India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेवर २३८ धावांनी विजय मिळवून मालिका २-० अशी खिशात घातली. भारताचा हा घरच्या मैदानावरील सलग १५ वा कसोटी मालिका विजय ठरला. तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हा १४ वा आंतरराष्ट्रीय सामना जिंकला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) दोन्ही डावात ( ५-२४ व ३-२३ ) मिळून ८ विकेट्स घेतल्या. दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी करणाऱ्या मॅन ऑफ दी मॅच, तर रिषभ पंतला मॅन ऑफ दी सीरिज हा पुरस्कार देण्यात आला.
भारताच्या पहिल्या डावातील २५२ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव १०९ धावांवर गडगडला. भारताने दुसरा डाव ९ बाद ३०३ धावांवर घोषित केला. ४४७ धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन मैदानावर उतरलेल्या श्रीलंकेने चौथ्या डावात चांगला खेळ केला. कर्णधार दिमुथ करुणारत्नेच्या शतकी खेळीने त्यांचे मनोबल उंचावले, परंतु भारतीय गोलंदाजांसमोर ते फार काही करू शकले नाही. १७४ चेंडूंत १५ चौकारांसह १०७ धावा करणारा करुणारत्ने त्रिफळाचीत झाला. यानंतर भारताला डाव गुंडाळण्यात फार कष्ट घ्यावे लागले नाही.
कर्णधार म्हणून पहिले दोन कसोटी सामने जिंकणारा रोहित शर्मा हा भारताचा पाचवा कर्णधार ठरला. यापूर्वी सचिन तेंडुलकर ( १९९६), सौरव गांगुली ( २०००), महेंद्रसिंग धोनी ( २००८), अजिंक्य रहाणे ( २०१७-१८) यांनी हा पराक्रम केला आहे. कसोटी कर्णधार म्हणून पदार्पणात प्रतिस्पर्धींना व्हाईट वॉश देणारा रोहित हा पहिला भारतीय कर्णधार ठरला. या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माने जेतेपदाची ट्रॉफी प्रियांक पांचालकडे सोपवली आणि परंपरा कायम राखताना स्वतः दूर जाऊन उभा राहिला.
रोहित शर्मा काय म्हणाला?''ही चांगली घोडदौड सुरू आहे आणि मी वैयक्तिक व संघ म्हणून त्याचा आनंद लुटतोय. संघ म्हणून आम्हाला काही गोष्टी मिळवायच्या होत्या आणि आम्ही त्यात यशस्वी ठरलो. रवींद्र जडेजा एक फलंदाज म्हणून कामगिरी उंचावतोय. त्याच्यामुळे संघाची ताकद वाढली आहे आणि त्याच्या गोलंदाजीतही कमालीची सुधारणआ पाहायला मिळतेय. क्षेत्ररक्षणात त्याचा हात कुणीच पकडू शकत नाही आणि म्हणून तो एक परिपूर्ण पॅकेज आहे,'' असे रोहित म्हणाला.
श्रेयस अय्यरच्या कामगिरीबद्दल रोहितने सांगितले की,''श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील फॉर्म त्याने कसोटीतही कायम राखला. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या अनुभवी खेळाडूंची जागा भरून काढायची आहे, याची जाण त्याला होती. त्याने त्याचे कौशल्य दाखवून दिले. संघासोबत तो जेव्हा आणखी प्रवास करेल, तेव्हा त्याची कामगिरी आणखी सुधरत जाईल. रिषभ पंतही प्रत्येक सामन्यागणिक कामगिरी उंचावतोय. त्याच्या खेळातून आत्मविश्वासही जाणवतोय.''
''आर अश्विन हा ऑल टाईम ग्रेट आहे, हे माझे वैयक्तिक मत आहे. त्याला गोलंदाजीची जेव्हा जेव्हा संधी दिली, तेव्हा त्याने मॅच विनिंग कामगिरी करून दाखवली. त्याच्यात आणखी बरीच वर्ष क्रिकेट खेळण्याची ऊर्जा आहे. त्यामुळे भविष्यात त्याची गरज भासणार आहे. पिंक बॉल कसोटी आव्हानात्मक असते,''असेही रोहित म्हणाला.
पाहा पूर्ण व्हिडीओ..