Join us  

IND vs SL, 2nd Test Live Updates : भारताने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला; Rohit Sharmaच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला

डिसेंबर २०१२मध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध मालिका गमावली होती आणि त्यानंतर घरच्या मैदानावर सलग १५ कसोटी मालिका विजय आहे. आतापर्यंत एकाही देशाला घरच्या मैदानावर १०पेक्षा अधिक कसोटी मालिका सलग जिंकता आलेल्या नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 5:51 PM

Open in App

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : भारताच्या पहिल्या डावातील २५२ धावांच्या प्रत्युत्तरात  श्रीलंकेचा पहिला डाव १०९ धावांवर गडगडला. भारताने दुसरा डाव ९ बाद ३०३ धावांवर घोषित केला. ४४७ धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन मैदानावर उतरलेल्या श्रीलंकेने चौथ्या डावात चांगला खेळ केला. कर्णधार दिमुथ करुणारत्नेच्या शतकी खेळीने त्यांचे मनोबल उंचावले, परंतु भारतीय गोलंदाजांसमोर ते फार काही करू शकले नाही. श्रीलंकेचा दुसरा डाव २०८ धावांवर गुंडाळून भारताने २३८ धावांनी सामना जिंकला. भारताचा हा घरच्या मैदानावरील सलग १५ वा कसोटी मालिका विजय ठरला. तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हा १४ वा आंतरराष्ट्रीय सामना जिंकला.  

रोहित शर्मा पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर  3-0 vs New Zealand3-0 vs West Indies3-0 vs West Indies3-0 vs Sri Lanka2-0 vs Sri Lanka भारताने विजयासाठी ठेवलेल्या ४४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला दुसऱ्या डावात पहिल्याच षटकात धक्का बसला. जसप्रीत बुमराहने सलामीवीर लाहिरू थिरीमानेला भोपळ्यावर माघारी पाठवले. पण, त्यानंतर कुशल मेंडिस व दिमूथ करुणारत्ने यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. मेंडिसने ५७ चेंडूंत कसोटीतील १२ वे अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार दिमूश व मेंडिस सुरेख खेळत होते आणि  वेगाने धावाही वाढवत होते. त्यामुळे भारतीय गोलंदाज किंचितसे निराश दिसले, परंतु आर अश्विनने ही जोडी तोडली. त्याने मेंडिसला ( ५४)  पुढे येऊन फटका मारण्यास भाग पाडले आणि रिषभ पंतने चपळाईने त्याला यष्टिचीत केले. त्यानंतर रवींद्र जडेजाने पुढच्याच षटकात अँजेलो मॅथ्यूजचा त्रिफळा उडवला. दोन षटकांत दोन विकेट गेल्याने श्रीलंकेवरील दडपण वाढले.

तिसऱ्या दिवसाच्या टी ब्रेकपर्यंत श्रीलंकेचे ४ फलंदाज १५१ धावांवर माघारी परतले होते. ब्रेकनंतर कर्णधार रोहितने गोलंदाजीसाठी अक्षर पटेलला आणले आणि त्याने श्रीलंकेला दोन धक्के दिले. निकोशान डिकवेला ( १२) व चरिथ असलंका ( ५) यांना त्याने बाद केले. कर्णधार करुणारत्नेने कसोटीतील १४ वे शतक पूर्ण केले. २०१८  पासून कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून दिमुथ करुणारत्नेने सर्वाधिक २४४८ धावा केल्या आहेत. दिवस-रात्र कसोटीच्या चौथ्या डावात शतक झळकावणारा करुणारत्ने हा पहिला सलामीवीर आणि पहिला कर्णधार ठरला आहे. पण, करुणारत्नेचा हा संघर्ष जसप्रीत बुमराहने मोडीत काढला. १७४ चेंडूंत १५ चौकारांसह १०७ धावा करणारा करुणारत्ने त्रिफळाचीत झाला. यानंतर भारताला डाव गुंडाळण्यात फार कष्ट घ्यावे लागले नाही.

डिसेंबर २०१२मध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध मालिका गमावली होती आणि त्यानंतर घरच्या मैदानावर सलग १५ कसोटी मालिका विजय आहे. आतापर्यंत एकाही देशाला घरच्या मैदानावर १०पेक्षा अधिक कसोटी मालिका सलग जिंकता आलेल्या नाहीत.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्माजसप्रित बुमराह
Open in App