India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : श्रीलंकेच्या फलंदाजांनी दुसऱ्या कसोटीत किंचितसा संघर्ष दाखवला आहे. कुशल मेंडिस व दिमूथ करुणारत्ने यांनी ९७ धावांची भागीदारी करून भारतीय संघाची डोकेदुखी वाढवली होती. पण, आर अश्विनने ( R Ashwin) ती दूर केली. त्याला रवींद्र जडेजाची साथ मिळाली. तिसऱ्या दिवसाच्या टी ब्रेकपर्यंत श्रीलंकेचे ४ फलंदाज १५१ धावांवर माघारी परतले आहेत. त्यांना विजयासाठी २९४ धावा, तर भारताला ६ विकेट्स हव्या आहेत. दरम्यान, अश्विनने आज दुसरी विकेट घेत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
भारताने विजयासाठी ठेवलेल्या ४४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला दुसऱ्या डावात पहिल्याच षटकात धक्का बसला. जसप्रीत बुमराहने सलामीवीर लाहिरू थिरीमानेला भोपळ्यावर माघारी पाठवले. पण, त्यानंतर कुशल मेंडिस व दिमूथ करुणारत्ने यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. मेंडिसने ५७ चेंडूंत कसोटीतील १२ वे अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार दिमूश व मेंडिस सुरेख खेळत होते आणि वेगाने धावाही वाढवत होते. त्यामुळे भारतीय गोलंदाज किंचितसे निराश दिसले, परंतु आर अश्विनने ही जोडी तोडली. त्याने मेंडिसला ( ५४) पुढे येऊन फटका मारण्यास भाग पाडले आणि रिषभ पंतने चपळाईने त्याला यष्टिचीत केले. त्यानंतर रवींद्र जडेजाने पुढच्याच षटकात अँजेलो मॅथ्यूजचा त्रिफळा उडवला. दोन षटकांत दोन विकेट गेल्याने श्रीलंकेवरील दडपण वाढले.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये आर अश्विनने ८वे स्थान पटकावले आहे. त्याने ८६ कसोटीत ४४० विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज डेल स्टेन याचा ९३ कसोटींत ४३९ विकेट्सचा विक्रम मोडला. आता अश्विनना सातव्या क्रमांकावर झेप घेण्यासाठी वेस्ट इंडिजचे दिग्गज कर्टनी वॉल्श ( ५१९) यांचा विक्रम खुणावत आहे.
कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू
- मुथय्या मुरलीधरन - ८००
- शेन वॉर्न - ७०८
- जेम्स अँडरसन - ६४०
- अनिल कुंबळे - ६१९
- ग्लेन मॅकग्राथ - ५६३
- स्टुअर्ट ब्रॉड - ५३७
- कर्टनी वॉल्श - ५१९
- आर अश्विन - ४४०
- डेल स्टेन - ४३९
- कपिल देव - ४३४