भारतीय संघ सध्या बंगळुरूमध्ये श्रीलंकेविरूद्ध दुसरी कसोटी खेळत आहे. या कसोटीत श्रीलंकेला चौथ्या डावात ४५० पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य दिलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताने पहिली कसोटी मालिका जिंकत इतिहास रचला. पण विराटने जरी कर्णधारपद सोडलं असलं तरी त्याचा चाहतावर्ग अजूनही तितकाच मोठा आहे. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी साऱ्यांनाच त्याचा प्रत्यय आला. सुरक्षाकडं भेदून चार प्रेक्षक थेट विराटसोबत सेल्फी काढून गेले. या प्रसंग ताजा असतानाच 'रोहित आमचा कर्णधार नाही, विराटला पुन्हा कर्णधार करा', या पोस्टरने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
विराट कोहली गेली अनेक वर्षे RCB संघाकडून IPL खेळतो. बंगळुरू हे त्याच्यासाठी होम ग्राउंडच आहे. त्यामुळे त्याला येथे जबरदस्त पाठिंबा मिळताना दिसत आहे. या दरम्यान, रविवारी दोन मुले एक पोस्टर घेऊन बेंगळुरू स्टेडियमवर पोहोचलेली दिसली. त्या पोस्टरवर लिहिलं होतं की, 'रोहित शर्मा आमचा कर्णधार नाही, विराट कोहलीला पुन्हा कर्णधार बनवा.' हा फोटो त्या मुलांच्या वडिलांनी ट्विट केला होता, जो खूप वेगाने व्हायरल झाला.
यानंतर सोशल मीडियावर एक चर्चा सुरू झाली, ज्यावर लोकांनी लिहिले की, रोहित शर्मा देशाचा कर्णधार आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल असे बोलणे योग्य नाही. त्याच वेळी, काही लोकांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या घोषणाबाजीवर आक्षेप घेतला आणि क्लब क्रिकेटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर ठेवण्याचे सल्ले दिले. या फोटोची अनेकांनी खिल्लीही उडवली आणि लिहिले की, रोहित तुझा कर्णधार नाही कारण तू संघात नाहीस. तर काही युजर्सनी उत्तर दिले की, रोहित देशाचा कर्णधार आहे, कदाचित तुमच्या मुलांचा नसेल.