गुलाबी चेंडू खेळण्यात येत असलेल्या भारत-श्रीलंका दुसऱ्या कसोटीत भारताचा पहिला डाव २५२ धावांवर तर श्रीलंकेचा पहिला डाव १०९ धावांवर आटोपला. दुसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव सुरू झाला. भारताने दुसरा डाव ३०३ धावांवर घोषित केला. या डावात श्रेयस अय्यरने अर्धशतकी (६७) खेळी केली. पण रिषभ पंतच्या अर्धशतकाची सर्वाधिक चर्चा रंगली. पंतने कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद अर्धशतक ठोकत माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडला. त्याच्या या खेळीबद्दल सूर्यकुमार यादवने एक मजेशीर ट्वीट केलं.
रिषभ पंत मैदानात आल्यावर लगेचच त्याने तुफान फटकेबाजी केली. त्याने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना ७ चौकार व २ षटकार खेचले. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम रिषभच्या नावावर नोंदवला गेला. हा विक्रम मागील ४० वर्षे कपिल देव यांच्या नावावर होता. रिषभ ३१ चेंडूंत ५० धावा करून बाद झाला. त्याच्या दमदार इनिंगबद्दल सूर्याने ट्वीट केलं. 'आम्ही या मुलाला ओळखतो', असं ट्वीट करत त्याने एक स्माईलचा इमोजी वापरत रिपभ पंत असा हॅशटॅग वापरला. तसेच, पॅन्टचं एक इमोजी वापरून पॅन्टरटेनमेंट (Pant - Entertainment) असंही मजेशीर ट्वीट केलं.
--
दरम्यान, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकानंतर भारताने दुसऱ्या दिवसरात्र कसोटीत रविवारी श्रीलंकेला ४४७ धावांचे लक्ष्य दिले. त्यानंतर २८ धावांवर एक बळी घेत यजमान संघाने आपले वर्चस्व कायम राखले. कर्णधार रोहित शर्मा (४६ धावा), हनुमा विहारी (३५) यांनीही उपयुक्त खेळी केली. श्रीलंकेकडून डाव्या हाताचा फिरकीपटू प्रवीण जयविक्रम याने ७८ धावांत चार तर लसिथ एम्बुलडेनियाने ८७ धावांत तीन बळी घेतले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार दिमुथ करुणारत्ने १० तर कुसाल मेंडिंस १६ धावांवर खेळत होते.