बेंगळुरू : फिरकीला पोषक वाटणाऱ्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजांची परीक्षा सुरू असून श्रीलंकेविरुद्ध गुलाबी चेंडूने खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारताचा पहिला डाव केवळ २५२ धावात आटोपला. पाठोपाठ पाहुण्या संघाची दाणादाण उडाली. वेगवान जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यापुढे लंकेने सहा फलंदाज केवळ ८६ धावात गमावले.
बुमराहने दोन तर शमीने एक गडी बाद केला. अँजेलो मॅथ्यूज पडझड थोपविण्यासाठी संघर्ष करीत आहे. कुसाल मेंडिस २, लाहिरू थिरिमाने ८ आणि कर्णधार दिमुथ करुणारत्ने (४) धनंजया डीसिल्वा (१०) हे लवकर बाद झाले. भारताचा डाव ५९.१ षटकात आटोपला. श्रेयस अय्यरने सर्वाधिक ९२, तर ऋषभ पंत आणि हनुमा विहारी यांनी अनुक्रमे ३९ आणि ३१ धावा केल्या.
असमतोल उसळी असलेली ही खेळपट्टी पहिल्या दिवसापासूनच फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. फिरकीपटूंना पोषक या खेळपट्टीवर भारताने पहिल्या सत्रात चार, तर दुसऱ्या सत्रात सहा फलंदाज गामवले. लंकेकडून डावखुरा फिरकी गोलंदाज लसिथ एम्बुलदेनिया आणि प्रवीण जयविक्रम यांनी ३-३ फलंदाज बाद केले. त्याआधी भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेत पहिल्या डावात २५२ धावा उभारल्या.
सहकारी खेळाडू संघर्ष करीत असताना श्रेयस अय्यरने ९८ चेंडूत ९२ धावा ठोकल्या. तो प्रवीण जयविक्रमच्या चेंडूवर यष्टिचित झाला. अय्यर खेळपट्टीवर आला त्यावेळी भारताने ८४ धावांत चार फलंदाज गमावले होते. चौथी कसोटी खेळत असलेल्या श्रेयसने एक टोक सांभाळून वेगवान धावा केल्या, मात्र कारकिर्दीत दुसरे शतक फळकाविण्यात तो अपयशी ठरला.
कोहली कसोटीत ३४ व्यांदा पायचित झाला. मागील ७२ डावांमध्ये तो शतक झळकावू शकलेला नाही.मयांक अग्रवाल ३५ कसोटी डावांत पहिल्यांदा धावबाद झाला.रविचंद्रन अश्विनचा हा २५० वा, तर रोहितचा ४०० वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. रोहितने आतापर्यंत २३० वन-डे, १२५ टी-२० आणि ४४ कसोटी सामने खेळले. भारताकडून अशी कामगिरी करणारा तो आठवा खेळाडू आहे.