India vs Sri Lanka, 2nd Test : १०० टक्के पूर्ण क्षमतेने भरलेल्या बंगळुरू स्टेडियमवरील Pink Ball Test मध्ये पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात यजमान श्रीलंकेचे वर्चस्व दिसले. खेळपट्टीवर सुरुवातीपासून मिळणाऱ्या अनपेक्षित उसळीमुळे भारतीय फलंदाजांना अडचणीचा सामना करावा लागला. मयांक अग्रवालची विकेट वगळली, तर अन्य फलंदाज याच फिरकीच्या जाळ्यात अडकले. विराट कोहली ( Virat Kohli) विचित्र पद्धतीने बाद झाला. कसोटीच्या पहिल्याच दिवशी खेळपट्टीचा असे रुप पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जयंत यादवच्या जागी आज प्लेइंग इलेव्हनमध्ये अक्षर पटेलचे पुनरागमन झाले. नोव्हेंबर २०२१पासून अक्षर क्रिकेटपासून दूर होता. त्याच्या दुखापतीवर उपचार सुरू होते आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या सर्व अडचणींवर मात करून अक्षर आज मैदानावर परतला आहे. रोहित व मयांक यांनी टीम इंडियाला चांगली सुरूवात करून देणे अपेक्षित होतं, परंतु दुसऱ्याच षटकात गोंधळ झाला अन् मयांकला माघारी जावं लागलं.
विश्वा फर्नांडोच्या गोलंदाजीवर श्रीलंकन खेळाडूंनी मयांकसाठी LBW ची जोरदार अपील केले. मयांक लेग बायवर धाव घेण्यासाठी धावला आणि खेळपट्टीच्या मधोमध येताच रोहितने त्याला माघारी जाण्यास सांगितले. तो धावबाद झाला, परंतु चेंडू स्टम्पला लावण्यापूर्वी यष्टिरक्षक डिकवेलाने DRS घेतला. सरतेशेवटी तो NO Ball असल्याचे समोर आले आणि मयांकची अशी विकेट पडली. मयांक ४ धावांवर धावबाद होऊन माघारी परतला. रोहितलाही फिरकीच्या जाळ्यात ओढून लसिथ इम्बुल्डेनियाने स्लीपमध्ये झेलबाद केले. रोहित १५ धावांवर माघारी परतला.
विराट व हनुमा विहारी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करताना तिसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली, परंतु प्रविण जयविक्रमाच्या सुरेख फिरकीने विहारीची विकेट घेतली. चेंडूने अचानक घेतलेली उसळी घेऊन विहारी चाचपडला अन् यष्टिरक्षकाने त्याचा तितकाच अप्रतिम झेल टिपला. विहारी ३१ धावांवर बाद झाला. धनंजय डी सिल्वाच्या गोलंदाजीवर विराट LBW झाला. धनंजयने टाकलेला चेंडू खालीच राहिला अन् विराट फसला . तो २३ धावा करून माघारी परतला. टी ब्रेकपर्यंत भारताचे ४ फलंदाज ९० धावांवर माघारी परतले होते.
पाहा व्हिडीओ.