तिरुवनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने विश्वविक्रमी विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना ३९० धावा कुटल्यानंतर श्रीलंकेला केवळ ७३ धावांत गुंडाळत टीम इंडियाने धावांच्या दृष्टीने वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. भारताने श्रीलंकेला ३१७ धावांनी पराभूत केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कुठल्याही संघाने तीनशेहून अधिक धावांनी विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताकडून मोहम्मद सिराजने भेदक मारा करत चार बळी टिपले. तर विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी शतके फटकावली.
भारताने दिलेल्या ३९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. मोहम्मद सिराजने भेदक मारा करत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडले. अविष्का फर्नांडो (१), कुशल मेंडिस (४), वनिंदू हसरंगा (१) आणि नुवानिदू फर्नांडो यांना बाद करत लंकेच्या डावाला खिंडार पाडले. या धक्क्यातून लंकेचा संघ सावरलाच नाही. अखेर श्रीलंकेचा संपूर्ण डाव २२ षटकांमध्ये अवध्या ७३ धावांत आटोपला. भारताकडून सिराजने ४ तर शमी आणि कुलदीपने प्रत्येकी २ गडी बाद केले. श्रीलंकेकडून नुवानिदू फर्नांडोने सर्वाधिक १९ धावा केल्या.
दरम्यान, भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारतीय संघाला ९५ धावांची सलामी दिली. रोहित शर्मा ४२ धावा काढून बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली. यादरम्यान शुभमन गिलने आपलं शतक पूर्ण केलं. गिल ११६ बाद झाल्यानंतर विराट कोहलीने श्रेयस अय्यरच्या साथीने श्रीलंकेची धुलाई सुरू ठेवली. दरम्यान, विराटने आपलं वनडे कारकीर्दीतील शतकही पूर्ण केलं. श्रेयस अय्यर ३८ धावा काढून बाद झाला. मात्र विराट कोहलीने एक बाजू लावून धरताना श्रीलंकन गोलंदाजांची पिटाई सुरू ठेवली.
अवघ्या ११० चेंडूत १३ चौकार आणि तब्बल ८ षटकारांच्या मदतीने १६६ धावा कुटणाऱ्या विराट कोहलीच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ५ बाद ३९० धावांचा टप्पा ओलांडला होता. श्रीलंकेकडून कसून रजिथा आणि लहिरू कुमारा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले होते.