Sri Lanka Captain Charith Asalanka Planning, IND vs SL: १९९७ नंतर तब्बल २७ वर्षांनी श्रीलंकेच्या संघाने टीम इंडियाला वनडे मालिकेत पराभवाची धूळ चारली. पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर श्रीलंकेने दुसरा सामना ३२ धावांनी तर तिसरा सामना ११० धावांनी जिंकला. भारतीय संघासाठी हा एक लाजिरवाणा पराभव ठरला. हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह वगळता भारताच्या वरिष्ठ संघातील सर्व खेळाडू या मालिकेसाठी खेळत होते. असे असूनही भारतावर पराभवाची नामुष्की ओढवली. रोहित शर्मा, विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंसाठी ही टी२० विश्वचषक जिंकल्यानंतरची पहिलीच क्रिकेट मालिका होती. त्यात भारताला मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला. कागदावर बलाढ्य दिसणाऱ्या टीम इंडिया कसं हरवलं, याबद्दलचं 'प्लॅनिंग' श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंकाने मालिकेच्या शेवटी सांगितले.
"मी आता सर्वात आनंदी कर्णधार आहे. आमच्या संघाने संपूर्ण मालिकेत कुठल्याही चूका केल्या नाहीत. आम्ही अतिशय उत्तम खेळ केला आणि त्याचाच मला सर्वात जास्त आनंद आहे. बलाढ्य भारतीय संघाची ताकद ही त्यांच्या दमदार बॅटिंग लाइन अप म्ध्ये आहे, याची आम्हा पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे आम्हाला फक्त त्यांची फलंदाजीची बाजू थोडी कमकुवत करायची होती. त्यासाठी आम्ही आमच्या बलस्थानांवर लक्ष दिले. आमचे स्पिनर्स ही आमची ताकद आहेत. त्याचाच आम्ही वापर केला आणि बलाढ्य वाटणाऱ्या भारतीय संघाला पराभूत करू शकलो," असे असलंका म्हणाला.
"भारताची फलंदाजी कमकुवत करण्यासाठी आम्हाला काही गोष्टींशी तडजोड करावी लागली. पिचमुळे भारताप्रमाणे आमच्याही फलंदाजांना बराच त्रास झाला. संघाची धावसंख्या वाढण्यास खूप वेळ लागला. पण जर तुम्हाला एखादी मालिका जिंकायची असेल तर तुम्हाला आव्हानात्मक स्वरुपाचे पिच बनवावेच लागते. आमचा संघ सध्या अतिशय चांगल्या लयीत आहोत. आमचे कोच सनथ जयसूर्या यांनी आम्हाला मदत केली. त्यांनी या संघात काही महत्त्वाचे बदल केले आणि संघातील खेळीमेळीच्या वातावरणाचा सर्वच खेळाडूंवर सकारात्मक परिणाम झाला," अशा शब्दांत कर्णधाराने कोच जयसूर्याचेही आभार मानले.
दरम्यान, शेवटच्या वनडे सामन्यात अविष्का फर्नांडोच्या ९६ धावांच्या बळावर श्रीलंकेने ७ बाद २४८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा संपूर्ण डाव १३८ धावांतच गुंडाळला गेला. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली.