भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने शतकी खेळी केली. तर शुभमन गिलपाठोपाठ विराट कोहलीनेही दमदार शतकी खेळी केली. मात्र विराट कोहली शतकाच्या उंबरठ्यावर असताना त्याने मारलेला एक फटका श्रीलंकेच्या दोन क्षेत्ररक्षकांना जायबंदी करून गेला. विराटने स्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा जोरदार फटका अडवताना बंदारा आणि वँदेरेसे या श्रीलंकेच्या दोन क्षेत्ररक्षकांमध्ये जोरदार टक्कर झाली. त्यामुळे काही काळ खेळ थांबवावा लागला. तसेच दोन्ही खेळाडूंना स्ट्रेचरवरून बाहेर न्यावे लागले.
भारताच्या डावातील ४३ व्या षटकात विराट कोहली ९५ धावांवर खेळत होता. त्याने षटकातील पाचव्या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या दिशेने फटकावला. वेगाने सीमारेषेकडे सुटलेला हा चेंडू रोखण्यासाठी श्रीलंकेचे बंडारा आणि वँदेरेसे हे दोन क्षेत्ररक्षक धावत आले. मात्र चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात त्यांच्यात भीषण टक्कर झाली. तसेच हे दोन्ही क्षेत्ररक्षक गंभीररीत्या जायबंदी झाले. त्यानंतर मेडिकल स्टाफने मैदानात धाव घेतली. तसेच या खेळाडूंना स्ट्रेचरवरून नेण्यात आले. दरम्यान, चेंडू सीमापार गेल्याने विराट कोहलीला चार धावा मिळाल्या. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर एकेरी धाव घेत विराटने आपलं शतक पूर्ण केलं.
दरम्यान, भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच केली आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारती. संघाला ९५ धावांची सलामी दिली. रोहित शर्मा ४२ धावा काढून बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली. यादरम्यान शुभमन गिलने आपलं शतक पूर्ण केलं. गिल बाद झाल्यानंतर विराट कोहलीने श्रेयस अय्यरच्या साथीने श्रीलंकेची धुलाई सुरू ठेवली. दरम्यान, विराटने आपलं वनडे कारकीर्दीतील शतकही पूर्ण केलं.