IND vs SL 3rd T20 Toss Updates Playing XI: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा सामना आज गुवाहाटी येथे खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बाजी मारली आहे. त्यामुळे सध्या मालिका बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे, टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हन मध्ये एकही बदल करण्यात आलेला नाही. श्रीलंकेने मात्र अविष्का फर्नांडोला संघात घेत, त्याच्या जागी भानुका राजपक्षेला संघाबाहेर बसवले आहे.
भारताला मायदेशात मालिका जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही बाबतीत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला दमदार कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. असे आहेत दोन संघ-
भारताचा संघ: हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग
श्रीलंकेचा संघ: दसुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), अविष्का फर्नांडो (भानुका राजपक्षेच्या जागी संघात स्थान), धनंजया डी सिल्वा, चरिथ असालांका, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश तिक्षणा, कसून रजिथा, दिलशान मदुशंका
"आजच्या सामन्याची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे असा आमचा अंदाज आहे. इथले वातावरण थंड आहे त्यामुळे नंतरच्या डावात चेंडू सहज बॅटवर येईल आणि चेंडू चांगला उडेल. आम्ही आधीच्या सामन्यात काही चुका केल्या आहेत. पण जेव्हा जेव्हा आम्ही चुका केल्यात तेव्हादेखील आम्ही कडवी झुंज दिली आहे. त्यामुळे आताही आम्ही जिंकायच्या इराद्यानेच खेळू," असे हार्दिक पांड्या नाणेफेकीनंतर फलंदाजी घेताना म्हणाला.