Suryakumar Yadav Virat Kohli, IND vs SL 3rd T20: श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने २० षटकांत २२८ धावांपर्यंत मजल मारली. सूर्यकुमार यादवचे झंझावाती शतक (नाबाद ११२) आणि शुबमन गिल (४४), राहुल त्रिपाठी (३५ धावा) यांच्या छोट्या पण उपयुक्त खेळी यांच्या जोरावर भारताने श्रीलंकेला निर्णायक सामन्यात २२९ धावांचे मोठे आव्हान दिले. सूर्यकुमार यादवने श्रीलंकेच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. त्याने ४५ चेंडूत शतक ठोकले. त्याच्या या खास शतकाचे खुद्द विराट कोहलीने देखील विशेष कौतुक केले.
सूर्यकुमार यादव जेव्हा मैदानात आला तेव्हा पॉवरप्ले संपला होता. त्यामुळे सावधपणे डाव पुढे नेण्याची भारताची भूमिका होती. पण सूर्यकुमारने मात्र खेळपट्टीचा अंदाज घेतला आणि मग जोरदार धुलाई सुरू केली. सगळ रेषेतील फटके तर त्याने मारलेच पण त्यासोबतच लॅप शॉट मारून त्याने वेगवान गोलंदाजांची सारी हवाच काढून टाकली. चेंडू थोडा जरी अंगावर आला तरी सूर्यकुमार यादव त्या चेंडूवर लॅप शॉट मारताना दिसला. त्यानंतर गोलंदाजाने लाईन बदलली तर सुर्यकुमाकर सरळ रेषेत किंवा आडव्या बॅटने फलंदाजी करत होता. त्यामुळे श्रीलंकेचे गोलंदाज हतबल दिसले. याच दरम्यान सूर्यकुमार यादवने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सूर्याने ४४ सामन्यांच्या ४२ डावांमध्ये १४६६ धावा केल्या होत्या. आज त्याने दमदार शतक ठोकत १५०० धावांचा टप्पा ओलांडला. ७ चौकार आणि ९ षटकारांच्या जोरावर त्याने नाबाद ११२ धावा कुटल्या. त्यानंतर विराट कोहलीने आपल्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर सुर्यकुमार यादवचा फोटो शेअर केला आणि अप्रतिम खेळी खेळल्याबद्दल टाळ्या वाजवण्याचे इमोजीदेखील वापरले.
दरम्यान, सामन्यात नाणेफेक जिंकताच हार्दिकने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इशान किशन पहिल्याच षटकात बाद झाला. पण त्यानंतर राहुल त्रिपाठीने मात्र हार्दिकचा निर्णय योग्य ठरवला. नवख्या राहुल त्रिपाठीने १६ चेंडूत तुफानी ३५ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने दमदार खेळीला सुरूवात केली. शुबमन गिलच्या साथीने त्याने अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतरही तो फटकेबाजी करतच राहिला. शुबमन गिल अर्धशतकाच्या जवळ पोहोचला पण त्याला ४४ धावांवर हसरंगाने माघारी धाडले.
त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या मोठा फटका मारताना ४ धावांवर बाद झाला. पाठोपाठ दीपक हु़ड्डादेखील ४ धावांवरच बाद झाला. हे दोघेही स्वस्तात बाद झाले पण सूर्यकुमारने मात्र फटकेबाजी बंद केली नाही. त्याने वाऱ्याच्या वेगाने बॅट फिकवत आपले तिसरे आणि भारतीय फलंदाजाकडून यंदाच्या वर्षातील पहिले टी२० शतक ठोकले. त्याने ४५ चेंडूत १०० धावा केल्या. अक्षर पटेलनेही चांगली फटकेबाजी केली. त्याने ९ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद २१ धावा कुटल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादवने नाबाद ११२ धावा करत संघाला २२८ धावांची मजल मारून दिली. सूर्याने ७ चौकार आणि ९ षटकार खेचले.