Suryakumar Yadav Gautam Gambhir, IND vs SL 3rd T20: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज (३० जुलै) इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना पल्लेकेले येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता हा सामना खेळवला जाईल. भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना ४३ धावांनी जिंकला होता. यानंतर त्यांनी दुसरा सामना ७ विकेट्सने जिंकून मालिकेवर कब्जा केला. आता भारतीय संघाला तिसरा सामना जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे.
कोच-कर्णधार इतिहास रचण्याची संधी
टीम इंडियाने आतापर्यंत अनेक मालिका जिंकल्या आहेत. पण नियमित कर्णधार म्हणून सूर्याची ही पहिलीच मालिका आहे. तसेच, नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची ही पहिलीच मालिका आहे. अशातच या जोडीला एक मोठा इतिहास रचण्याची संधी आहे. भारतीय संघाने जर तीन सामन्यांची मालिका ३-०ने जिंकली तर घरच्या मैदानावर ३ सामन्यांच्या T20 मालिकेत प्रथमच भारत श्रीलंकेला 'क्लीन स्वीप' देईल.
श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाची ३ सामन्यांची ही दुसरी द्विपक्षीय T20 मालिका आहे. यापूर्वी जुलै २०२१ मध्ये मालिका खेळवण्यात आले होती. पण तेव्हा श्रीलंकेने ही मालिका २-१ ने जिंकली होती. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत (सध्याच्या मालिकेसह) एकूण ७ द्विपक्षीय T20 मालिका या ३ सामन्यांच्या खेळल्या गेल्या आहेत. या कालावधीत भारताने ६ वेळा विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेने एकदाच विजय मिळवला आहे. श्रीलंकेच्या संघाने हा एकमेव मालिका विजय जुलै २०२१ मध्ये मिळवला होता.