धरमशाला - भारतीय संघाने रविवारी धरमशाला येथे खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवत तीन टी-२० सामन्यांची मालिका ३-० अशा फरकाने खिशात घातली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने क्लीन स्विप केली आहे. दरम्यान, कालच्या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने विजेत्या संघाचा चषक उचलला आणि नंतर तो एका व्यक्तीकडे दिला. त्यानंतर रोहित शर्माने ज्या व्यक्तीकडे हा चषक दिला ती व्यक्ती कोण, याबाबतची चर्चा सुरू झाली होती.
दरम्यान, या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. कालचा सामना संपल्यानंतर रोहित शर्माने बक्षीस वितरण समारंभारत विजेत्या संघाची ट्रॉफी उचलली. त्यानंतर तो इतर खेळाडूंकडे गेला. तिथे फोटो सेशन झाल्यानंतर रोहित शर्मा पुढे गेला आणि त्याने जयदेव शाह यांच्याकडे ही ट्रॉफी दिली. त्यानंतर रोहित गमतीजमतीत रंगलेला दिसला.
जयदेव शाह हे भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या टी-२० मालिकेत बीसीसीआयकडून टीम इंडियासोबत राहणारे प्रतिनिधी आहेत. प्रत्येक मालिका किंवा स्पर्धेमध्ये क्रिकेट मंडळाकडून एक अधिकारी नेहमी भारतीय संघासोबत असतो. तो मॅनेजरची भूमिकासुद्धा पार पाडत असतो.
दरम्यान, जयदेव शाह स्वत:ही क्रिकेटपटू होते. त्यांनी रणजी स्पर्धेत सौराष्ट्रच्या संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यांनी १२० प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये सुमारे ३० च्या सरासरीने ५३५४ धावा काढल्या आहेत. त्यात दहा शतकांचाही समावेश आहे. तर लिस्ट ए सामन्यांमध्ये जयदेव शाह यांच्या नावार एक हजारांहून अधिक धावा आहेत.
जयदेव शाह यांची अजून एक ओळख म्हणजे ते बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शाह यांचे पुत्र आहे. शाह कुटुंबीयांचे सौराष्ट्र क्रिकेटमध्ये दीर्घकाळापासून वर्चस्व आहे. निरंजन शाह यांनीही बीसीसीआयमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती. आता जयदेव शाह हेसुद्धा त्याचा मार्गाने जात आहेत.