India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : Ishan Kishan Hospitalised: भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत श्रीलंकेवर ७ विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारत-श्रीलंका ( India vs Sri lanka) यांच्यातला तिसरा सामना आज धरमशाला येथे होणार आहे. पण, त्याआधी भारताला मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या सामन्यातील भारताच्या डावातील चौथ्या षटकात इशान किशनच्या ( Ishan Kishan) हेल्मेटवर चेंडू आदळला आणि सामन्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर स्कॅन करण्यात आले आणि ICU वॉर्डानंतर इशानला जनरल वॉर्डात शिफ्ट करण्यात आले होते. त्याच्या दुखापतीबाबत आता महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत.
भारताच्या डावातील चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इशानला दुखापत झाली. लाहिरू कुमाराने टाकलेला बाऊन्सर थेट इशानच्या हेल्मेटवर आदळला आणि त्यानंतर तो मैदानावर बसला. प्राथमिक उपचार घेऊन त्याने पुन्हा फलंदाजी केली. मात्र, १५ चेंडूंत १६ धावा करून तो माघारी परतला. त्यानंतर इशानला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याचे वृत्ता दैनिक जागरणने दिले. डोक्यावर मार लागल्यानंतर स्कॅन केलं जातं. त्यात घाबरण्यासारखं काही नसल्याचे, सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. इशानला आता साध्या वॉर्डात हलवण्यात आले.त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. पण, तो आजच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.
दीपक चहर, ऋतुराज गायकवाड आणि सूर्यकुमार यादव यांनी आधीच दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घेतली होती. त्यात आता इशानच्या दुखापतीची भर पडली आहे. त्यामुळे आज इशान नाही खेळला, तर मयांक अग्रवालला संधी मिळू शकते. ऋतुराजच्या जागी मयांकचा संघात समावेश करण्यात आला आहे.