India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवण्याची मालिका कायम राखली आहे. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांना ट्वेंटी-२० मालिकेत भारताने सहज लोळवले. रोहितच्या नेतृत्वाखालील हे मालिकेतील सलग तिसरे निर्भेळ यश आहे. श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) हा आजही भारताच्या विजयाचा स्टार ठरला. त्याने सलग तिसरे अर्धशतक झळकावताना भारताचा ऐतिहासिक विजय पक्का केला. भारताचा हा सलग १२ वा ट्वेंटी-२० विजय आहे.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १४६ धावा केल्या दासून शनाकाने ३८ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७४ धावांची खेळी केली. अखेरच्या पाच षटकांत त्यांनी एकही विकेट न गमावता ६८ धावा केल्या. रोहित शर्मा ( १ ), संजू सॅमसन ( १८), दीपक हुडा ( २१) आज अपयशी ठरले. वेंकटेश अय्यरलाही ( ५) आज संधीचं सोनं करता आले नाही.श्रेयस आणि रवींद्र जडेजा या जोडीने पाचव्या विकेटसाठी २७ चेंडूंत नाबाद ४५ धावांची भागीदारी केली. या दोघांनी अगदी सहजतेनं भारताला ६ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. श्रेयस ४५ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ७३ धावांवर, तर जडेजा २२ धावांवर नाबाद राहिले.
रोहित शर्मा काय म्हणाला?''सर्व आघाडींवर दमदार खेळ झाला. आम्ही एकजुटीने खेळलो आणि जिंकला. या मालिकेतून बऱ्याच सकारात्मक गोष्टी संघाला मिळाल्या. त्या आता कायम सोबत ठेवायला हव्यात. अनेक युवा खेळाडूंना संधी दिल्याचा आनंद आहे. मी खेळाडूंना आधीच सांगितले होते, की संघातील स्थानाची चिंता करू नका. आम्हाला संघातील त्या उणीवा भरून काढायच्या होत्या आणि त्यात यशस्वी झालो. आता पुढे जायचंय... हे मोठे आव्हान आहे, परंतु सोबत फॉर्मात असलेले खेळाडू आहेत. खेळाडू मिळालेल्या संधीचं असंच सोनं करत राहिले तर संघाची ताकद दिवसेंदिवस वाढत जाईल. आम्ही मोहालीत दाखल झाल्यावर कसोटीचा विचार करण्यास सुरुवात करू,''असे रोहित म्हणाला.