दुबई - संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात येत असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताचा पुढील सामना श्रीलंकेशी होणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला भारताने पाकिस्तान आणि हाँगकाँगला पराभूत केले होते. मात्र सुपर ४ फेरीतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे टीम इंडियासाठी श्रीलंकेविरुद्धचा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे फेरबदल करू शकतात. पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर हे बदल होणार आहेत.
पाकिस्तानविरुद्धा रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी स्फोटक सलामी दिली होती. त्यानंतर विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली होती. श्रीलंकेविरुद्ध हे तिन्ही खेळाडू खेळणार हे निश्चित आहे. मात्र मधल्या फळीत सूर्यकुमार यादव (१३ धावा) आणि रिषभ पंत (१० धावा) अपयशी ठरले होते. अशा परिस्थितीत श्रीलंकेविरुद्ध त्याच्याऐवजी दिनेश कार्तिकला संधी मिळू शकते. तर सहाव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या आणि अष्टपैलू म्हणून दीपक हुड्डाला संधी दिली जाऊ शकते.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रवी बिश्नोईचा अपवाद वगळता इतरांची गोलंदाजी सुमार झाली होती. युझवेंद्र चहलने ४ षटकात ४३ धावा देऊन १ बळी टिपला होता. अशा परिस्थितीत त्याच्या जागी अश्विनला संधी दिली जाऊ शकते. तर भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंह यांना एक संधी दिली जाऊ शकते.
श्रीलंकेविरुद्ध असा असू शकतो टीम इंडियाचा अंतिम ११ खेळाडूंचा संघ रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, रवी बिश्नोई, रविचंद्रन अश्विन.