India vs Sri Lanka Women's Asia Cup 2022 Final : भारतीय महिला संघाने आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या महिला संघावर निर्विवाद वर्चस्व गाजवले. रेणुका सिंगने ( Renuka Singh) धक्क्यांमागून धक्का देताना श्रीलंकेची अवस्था ५ बाद १६ अशी केली. त्यात श्रीलंकेच्या दोन्ही ओपनर्सना घाई नडली आणि त्या रन आऊट झाल्या. रेणुकाने ३-१-५-३ अशी उल्लेखनीय कामगिरी केली. राजश्री गायकवाड व स्नेह राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासह थायलंड, पाकिस्तान व श्रीलंका यांनी आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. भारतीय संघाने ६ पैकी ५ सामने जिंकून १० गुणांसह तालिकेत अव्वल स्थान पटकावताना उपांत्य फेरीत धडक मारली. पाकिस्तानी महिलांनीही १० गुणांसह अंतिम चार संघांत स्थान पटकावले, परंतु नेट रन रेटमुळे त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. श्रीलंका ८ गुणांसह तिसऱ्या व थायलंड ६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहिले. भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत थायलंडवर आणि श्रीलंकेने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवून फायनल गाठली.