India vs Sri Lanka Women's Asia Cup 2022 Final : भारतीय महिला संघाने आशिया चषक २०२२ स्पर्धेत बाजी मारली. सलग आठव्यांदा आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या भारतीय महिलांचे हे सातवे जेतेपद ठरले. उपांत्य फेरीत पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवणाऱ्या श्रीलंकेच्या महिला संघाने फायनलमध्ये शरणागती पत्करली. रेणुका सिंगने ३-१-५-३ अशी उल्लेखनीय कामगिरी केली. राजश्री गायकवाड व स्नेह राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आणि श्रीलंकेला ९ बाद ६५ धावांपर्यंत रोखले.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तिसऱ्याच षटकात कर्णधार चमारी अट्टापटू ( ६) रन आऊट झाली. रिचा घोष व रेणुका सिंग यांनी सुरेख क्षेत्ररक्षण केले. त्यानंतर आलेल्या हर्षिता समरविक्रमा ( १), अनुष्का संजिवनी ( ० ) व हसिनि परेरा ( ०) या रेणुका सिंगच्या षटकात सलग तीन चेंडूंवर बाद झाल्या. अनुष्का रन आऊट झाल्याने रेणुकाची हॅटट्रिक झाली नाही. सहाव्या षटकात रेणुकाने तिसरी विकेट घेताना कविशा दिल्हारीला ( ६) बाद केले आणि श्रीलंकेचा निम्मा संघ १५ धावांत तंबूत परतला.
राजश्वरी गायकवाडने श्रीलंकेच्या निलक्षी डी सिल्व्हाचा ( ६) त्रिफळा उडवून सहावा धक्का दिला. स्नेह राणाने ७ वा धक्का देताना मल्शा स्नेहानीची विकेट घेतली. ओशादी रणसिंघे खिंड लढवत होती, परंतु गायकवाडने १३ धावांवर तिला त्रिफळाचीत केले. इनोका रनविराने २२ चेंडूंत नाबाद १८ धावा करताना श्रीलंकेला ९ बाद ६५ धावांपर्यंत पोहोचवले. लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मानधना व शफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ३.४ षटकांत ३२ धावा जोडल्या. शफाली ८ धावांवर बाद झाली. जेमिमा रॉड्रिग्सही २ धावांवर बाद झाली. स्मृतीने २५ चेंडूंत ६ चौकार ३ षटकारासह नाबाद ५१ धावा करून आशिया चषक जिंकला. भारताने ८.३ षटकांत २ बाद ७१ धावा केल्या.
भारताकडून सर्वाधिक ३ ट्वेंटी-२० फायनल जिंकणारी हरमनप्रीत कौर यशस्वी कर्णधार ठरली. तिने महेंद्रसिंग धोनी ( २) व रोहित शर्मा ( १) यांना मागे टाकले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"