India Squad Sri Lanka Series: भारतीय संघासाठी भविष्याची फळी तयार करण्याच्या हालचाली BCCI ने सुरू केल्या आहेत. त्यामुळे सातत्याने अपयशी ठरणाऱ्या आणि पूर्वीच्या पुण्याईवर संघात स्थान टिकवून ठेवणाऱ्या सीनियर खेळाडूंना त्यांनी आता इशारा दिला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेचा पाहुणचार करणार आहे. त्या मालिकेतील दोन कसोटी सामन्यांत युवा खेळाडूंना संधी देण्याचा आणि भविष्यासाठी त्यांना घडवण्याचा विचार BCCI ने पक्का केला आहे. त्यामुळे त्यांनी सध्याच्या संघातील चार सीनियर खेळाडूंना या मालिकेसाठी तुमची निवड केली जाणार नाही, असे सांगितले आहे.
निवड समिती व भारतीय संघ व्यवस्थापनाने मिळून हा निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार आता अजिंक्य रहाणे, वृद्धी मान सहा, इशांत शर्मा व चेतेश्वर पुजारा यांना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान मिळणार नाही. Ishant Sharma, Wriddhiman Saha, Ajinkya Rahane & Cheteshwar Pujara) या सर्वांना आगामी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत तुमचा विचार केला जाणार नाही, हे सांगण्यता आले आहे. असे वृत्त InsideSport.IN ने दिले आहे. ''निवड समिती या मालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या विचारात आहे. त्यामुळे निवड समितीने या चार सीनियर खेळाडूंना याबाबत कळवले आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघ व्यवस्थापनातील अन्य सीनियर सदस्यांशी सल्ला करून हा निर्णय घेतला गेला आहे,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने InsideSport.IN ला सांगितले.
पुजारा आणि रहाणे हे रणजी करंडक स्पर्धेत खेळणार आहे आणि त्या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर ते पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करू शकतात. पण, इशांत आणि सहा यांना भविष्यात तुमच्या नावाचा विचार केला जाणार नाही, हे स्पष्ट सांगण्यात आले आहे. ''इशांत आणि सहा यांचा वेळ संपलेला आहे, असे निवड समितीला वाटते. वयाचीही त्यांना आता साथ मिळू शकत नाही. भारतीय क्रिकेटसाठी त्यांचे योगदान अमुल्य आहे, परंतु आता पुढे जायला हवे,''असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केला.