Join us  

IND vs SL : हार्दिक पांड्याला पूर्णवेळ ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार बनवण्याच्या निर्णयाला इरफान पठाणचा विरोध, कारण... 

India vs Sri Lanka : Hardik Pandya T20I captaincy : हार्दिक पांड्या बुधवारपासून श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारताचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2023 10:45 AM

Open in App

India vs Sri Lanka : Hardik Pandya T20I captaincy : हार्दिक पांड्या बुधवारपासून श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारताचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. रोहित शर्माकडून ही जबाबदारी काढून घेतली जाण्याची शक्यता अधिक आहे. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप लक्षात घेता BCCI ही जबाबदारी हार्दिककडेच सोपवण्याची शक्यता बळावली आहे. पण, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने रोहितलाच ट्वेंटी-२० कर्णधारपदासाठी पाठिंबा दिला आहे आणि आता भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यानेही हार्दिकला भारताचा पूर्णवेळ ट्वेंटी-२० कर्णधार बनवण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे.  

इरफान पठाणने २००६ आणि २०१२ दरम्यान २४ ट्वेंटी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याने हार्दिकला पूर्णवेळ कर्णधार बनवण्याच्या निर्णयाच्या विरोधामागे अष्टपैलू खेळाडूच्या फिटनेसची चिंता असल्याचे कारण सांगितले. हार्दिकने २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय पुनरागमन केले. हार्दिकने अत्यंत सावधगिरी बाळगावी अशी इरफानची इच्छा आहे. “जेव्हा त्याच्या कर्णधारपदाबद्दल चर्चा होत होती, तेव्हा मी त्याच्या कार्यपद्धतीने प्रभावित झालो होतो, परंतु BCCI ला हे लक्षात ठेवावे लागेल की जर तुम्ही त्याला दीर्घकालीन कर्णधार बनवत असाल तर त्यांना त्याच्या फिटनेसवर खूप लक्ष केंद्रित करावे लागेल. तुम्ही त्याबाबत संघ व्यवस्थापनशी चर्चा करा आणि पुढील वाटचालीसाठी हे खूप महत्वाचे असेल, ” असे इरफान म्हणाला.

ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवानंतर हार्दिकची भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे, पण ही निवड रोहितच्या अनुपस्थितीतच आहे की पूर्णवेळ हे अद्याप अधिकृत झालेले नाही. मात्र, हार्दिककडे भविष्यात मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. ३८ वर्षीय माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण हा २०२२ च्या आयपीएलमधील गुजरात टायटन्ससोबत हार्दिक पांड्याच्या कर्णधार कौशल्याने खूप प्रभावित झाला होता. “हार्दिकने कर्णधारपद भूषविले आहे, मग ते आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी असो किंवा भारतासाठी, त्याची संवाद क्षमता खूपच चांगली आहे. तो खूप चपळ दिसत होता,” असेही इरफान म्हणाला.  

हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारताने मागील वर्षी ट्वेंटी-२० मालिकेत न्यूझीलंडवर १-० असा विजय मिळवला होता. दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर हार्दिकने बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. २०२२ च्या आशिया चषक स्पर्धेत त्याने एकहाती सामने जिंकून दिले. ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही त्याने चांगली कामगिरी केली होती.  

केवळ इरफान पठाणच नाही तर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचाही असा विश्वास आहे की, हार्दिक पांड्याचा नेता म्हणून उदय झाला असूनही भारताने रोहित शर्मासोबत ट्वेंटी-२० कर्णधार म्हणून पुढे जावे. “रोहित शर्माच्या नेतृत्वकौशल्याचे फक्त एका आयसीसी स्पर्धेद्वारे मुल्यमापन करणे योग्य नाही,” असे गंभीर म्हणाला होता.

भारताचा संघ: हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार. ( India’s squad for Sri Lanka T20Is: Hardik Pandya (Captain), Ishan Kishan (wk), Ruturaj Gaikwad, Shubman Gill, Suryakumar Yadav (VC), Deepak Hooda, Rahul Tripathi, Sanju Samson, Washington Sundar, Yuzvendra Chahal, Axar Patel, Arshdeep Singh, Harshal Patel, Umran Malik, Shivam Mavi, Mukesh Kumar.)

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाहार्दिक पांड्याइरफान पठाण
Open in App