Gautam Gambhir Team India, IND vs SL: भारताचा संघ २७ जुलैपासून श्रीलंकेत टी२० आणि वनडे मालिका खेळणार आहे. टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या साठी ही पहिली परीक्षा असणार आहे. मावळते मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने भारताच्या टी२० वर्ल्डकप विजयासाठी निरोप घेतला. तसेच, भारताचा युवा संघ लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली झिम्बाब्वेमध्ये ४-१ने मालिका जिंकून आला. त्यामुळे ही विजयी लय कायम राखणे ही गौतम गंभीरसाठी कसोटी असणार आहे. श्रीलंका विरूद्ध सर्वोत्तम ११ खेळाडू मैदानात उतरावेत हा गंभीरचा उद्देश असणार आहे. अशावेळी गंभीर एका स्टार खेळाडूला संघात घेण्यासाठी शब्द टाकण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा चीफ सिलेक्टर अजित आगरकर याची गंभीर लवकरच भेट घेणार आहे. यावेळी त्यांच्यात या खास खेळाडूबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
भारताचा संघ श्रीलंकेत ३ टी२० सामने खेळणार आहे. त्यानंतर ३ वनडे सामन्यांची मालिकाही रंगणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा या तिघांनी टी२० तून निवृत्ती स्वीकारली आहे. त्यांच्या जागी नव्या खेळाडूंना संधी दिली जाईल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. पण गौतम गंभीर मात्र एका अनुभवी खेळाडूसाठी शब्द टाकू शकतो अशी चर्चा आहे. संघ निवडीआधी गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांच्या बैठक होणार आहे. या बैठकीत गौतम गंभीर स्टार खेळाडू श्रेयस अय्यरसाठी शब्द टाकू शकतो अशी चर्चा आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाला विजेतेपद मिळवून देण्यात गौतम गंभीर इतकेच श्रेयस अय्यरचेही योगदान आहे. गेल्या काही काळापासून अय्यरला टी२० मध्ये फारशी संधी मिळालेली नाही. पण आता तीन अनुभवी खेळाडूंच्या निवृत्तीनंतर गंभीर अय्यरला संघ घेण्यासाठी आग्रही असू शकतो.
झिम्बाब्वे दौऱ्यावर न गेलेले सूर्यकुमार यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि रिषभ पंत यांना श्रीलंका दौऱ्यावर स्थान मिळू शकते. तर अभिषेक शर्मा, रियान पराग, ध्रुव जुरेल, तुषार देशपांडे यांना संघाबाहेर बसवले जाऊ शकते. झिम्बाब्वे मालिकेतील शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, रिंकू सिंग आणि शिवम दुबे या खेळाडूंना मात्र संघात कायम ठेवले जाऊ शकते.