इंदूर, भारत विरुद्ध श्रीलंका : भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर धडाकेबाज विजय मिळवला. श्रीलंकेविरुद्धच्या या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताचेच वर्चस्व पाहायला मिळाले. या विजयाच्या जोरावर भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
श्रीलंकेच्या १४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भाराताच्या लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी ७१ धावांची सलामी दिली, पण या दोघांनाही यावेळी अर्धशतक झळकावता आले नाही. राहुलने ४५ आणि धवनने यावेळी ३१ धावांची खेळी साकारली. हे दोघे बाद झाल्यावर खेळपट्टीवर असलेल्या श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी संघाच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला. पण संघाला विजयासाठी सहा धावांची गरज असताना अय्यर बाद झाला. अय्यरने २६ चेंडूंत ३४ धावा केल्या.
भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकत श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. श्रीलंकेच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण ही सुरुवात आक्रमक नव्हती. पण श्रीलंकेचा पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र त्यांना सातत्याने धक्के बसत गेले. त्यामुळे श्रीलंकेला यावेळी मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
श्रीलंकेला पहिला धक्का वॉशिंग्टन सुंदरने दिला. त्यानंतर कुलदीप यादवने डबल धमाका उडवला. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज नवदीप सैनीनेही यावेळी श्रीलंकेला दोन धक्के दिल्याचे पाहायला मिळाले. शार्दुल ठाकूरने एका षटकात तीन धावांत तीन फलंदाजांना बाद करत श्रीलंकेला मोठा धक्का दिला.