नवी दिल्ली : भारतीय संघ नववर्षातील आपल्या अभियानाची सुरूवात श्रीलंकेविरूद्धच्या मायदेशातील मालिकेतून करणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 ट्वेंटी-20 आणि 3 वन डे सामने खेळवले जाणार आहेत. आगामी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. संघाचा युवा यष्टीरक्षक खेळाडू ईशान किशनला श्रीलंकेविरूद्धच्या दोन्ही मालिकांमध्ये स्थान मिळाले आहे. त्याने काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या बांगलादेशविरूद्धच्या वन डे मालिकेतील अखेरच्या सामन्यात द्विशतक झळकावून इतिहास रचला होता.
दरम्यान, सर्वात जलद द्विशतक झळकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने केवळ 126 चेंडूत 200 धावांचा आकडा गाठून नवा विक्रम केला. अशातच आता त्याने रोहित शर्माचा 264 धावांचा विक्रम तोडणार असल्याचे म्हटले आहे. बांगलादेशातील चटगाव येथे झालेल्या वन डे सामन्यात किशनने 210 धावांची खेळी केली होती. ईशान किशनने 210 धावांच्या स्फोटक खेळीत 24 चौकार आणि 10 षटकार ठोकले होते.
ईशान किशनने फुंकले रणशिंग द ॲक्टिव्हिस्ट यूट्यूब चॅनलवर बोलताना ईशान किशनने म्हटले, "रोहित शर्माचा 264 धावांचा विक्रम मोडीत काढण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. पण, मला वाटत नाही की फक्त मीच हा विक्रम मोडेल, इतर क्रिकेटपटूही हा विक्रम मोडायला जातील. मी फक्त विक्रम मोडण्यासाठी मैदान उतरणार नाही तर त्याआधी संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन."
श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा ट्वेंटी-20 संघ -हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.
श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा वन डे संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.
भारत विरूद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
- 3 जानेवारी, मंगळवार - पहिला ट्वेंटी-20 सामना, मुंबई
- 5 जानेवारी, गुरूवार - दुसरा ट्वेंटी-20 सामना, पुणे
- 7 जानेवारी, शनिवार - तिसरा ट्वेंटी-20 सामना, राजकोट
- 10 जानेवारी, मंगळवार, पहिला वन डे सामना, गुवाहटी
- 12 जानेवारी, गुरूवार, दुसरा वन डे सामना, कोलकाता
- 15 जानेवारी, रविवार, तिसरा वन डे सामना, त्रिवेंद्रम
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"