चायनामॅन स्पिनर कुलदीप यादवला गेल्या काही दिवसांत फार कमी वेळा संधी मिळत आहेत. मात्र, तो जेव्हा जेव्ह मैदानात येतो तेव्हा तेव्हा तो स्वत:ला सिद्ध करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. कुलदीपने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपल्या चेंडूने कमाल दाखवली आणि पाहुण्या संघासाचे 3 महत्त्वपूर्ण बळी मिळवले. त्याला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले. या सामन्यानंतर त्याने रोहित आणि विराटच्या उपस्थितीत आपल्या मनातील गोष्टही शेअर केली.
कुलदीपनं केली कमाल - कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माने कुलदीपला संधी दिली होती. त्याने प्लेइंग-11 मध्ये केवळ एक बदल केला आणि युझवेंद्र चहलला वगळून कुलदीपला संघात घेतले. कुलदीपनेही कर्णधार रोहित आणि चाहत्यांचा विश्वास सार्थ ठरवला आणि अप्रतिम कामगिरी करत. 10 षटकांत 51 धावा देत 3 महत्त्वाचे बळी टीपले.
कमी संधी मिळण्यासंदर्भात कुलदीप म्हणाला... -सामना जिंकल्यानंतर 28 वर्षीय कुलदीप म्हणाला, "मी माझ्या कामगिरीवर खूश आहे. मला जेव्हा जेव्हा संधी मिळते, मी संपूर्ण क्षमतेने सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण खेळता, तेव्हा संपूर्ण लक्ष केंद्रित करावे लागते. सध्या मी माझ्या गोलंदाजीचा पूर्ण आनंद घेत आहे."तो पुढे म्हणाला, "टीम संयोजन महत्वाचे आहे. यासंदर्भात मी फारसा विचार करत नाही. फक्त संधी मिळाल्यानंतर सर्वोत्तम देण्यावर लक्ष केंद्रित करतो. आपण काही नवे करायला हवे. आपण एकाच वेगाने गोलंदाजी करू शकत नाही."
2017 मध्ये मिळाली डेब्यूची संधी - देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कुलदीपने 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. धर्मशाला येथे त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. त्याच वर्षी तो एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पणातही यशस्वी ठरला. कुलदीप यादवने आतापर्यंत 8 कसोटी, 74 एकदिवसीय आणि 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 34, एकदिवसीय सामन्यांत 122 आणि T20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये एकूण 44 विकेट्स घेतल्या आहेत.