नवी दिल्ली : आशिया चषकात (Asia Cup 2022) भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी उरलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. सुपर-4 च्या दुसऱ्या सामन्यात भारतालापाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला. अंतिम फेरीत पोहचण्यासाठी एकूण 4 संघ शर्यतीत आहेत. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या 4 संघामधील क्रमवारीत पहिल्या 2 स्थानावर राहणाऱ्या दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल. भारताचा आगामी सामना 6 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरूद्ध (IND vs SL) आहे, तर अफगाणिस्तानविरूद्ध देखील एक सामना होणार आहे. खरं तर उरलेले सर्व सामने चारही संघासाठी 'करा किंवा मरा' असे असणार आहेत.
दरम्यान, चारही संघ प्रत्येकी 2-2 सामने जिंकून इथपर्यंत पोहचले आहेत. क्रमवारीत पहिल्या दोन स्थानावर राहणाऱ्या संघांमध्ये 11 सप्टेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. लक्षणीय बाब म्हणजे आगामी सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघात बदल होण्याची शक्यता असून अक्षर पटेलची संघात एन्ट्री होऊ शकते. मात्र दिनेश कार्तिक, दीपक हुड्डा आणि ऋषभ पंत यांच्यापैकी कोणाला संधी मिळते हे पाहण्याजोगे असेल.
अक्षरला मिळू शकते संधीसलामीवीर म्हणून के.एल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा ही जोडी निश्चित असणार आहे. तर मधल्या फळीतीली फलंदाजीची जबाबदारी सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या खांद्यावर असेल. भारतीय संघाने डावखुरा फिरकीपटू वनिंदू हसरंगाविरुद्ध डावखुरा फलंदाजाचा प्रयोग सुरू ठेवला तर ऋषभ पंतचे स्थानही निश्चित झाले असून त्याच्यासोबत अक्षर पटेलला देखील संधी मिळू शकते. अक्षर गोलंदाजीसह साजेशी फलंदाजी करण्यासही सक्षम आहे. याशिवाय वेगवान गोलंदाजीमध्ये पर्याय नसल्यामुळे भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंगचे स्थान निश्चित असण्याची शक्यता आहे. मात्र रवी बिश्नोई आणि युजवेंद्र चहल यांच्यामधील कोणाला स्थान दिले जाते हे अद्याप अस्पष्ट आहे.
भारतीय संघाची संभावित प्लेइंग XIरोहित शर्मा (कर्णधार), के. एल राहुल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.
आशिया चषकासाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, दिनेश कार्तिक, आवेश खान, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन.