विश्वचषक-2023 मध्ये भारत विजयी रथावर स्वार आहे. त्याची जबरदस्त घोडदौड सुरू आहे. श्रीलंकेचा 302 या मोठ्या धावसंख्येने पराभव करून भारताने उपांत्य फेरीत धडक घेतली आहे. महत्वाचे म्हणजे, टॉप 4 साठी क्वॉलिफाय करणारा भारत हा पहिला देश आहे. या सामन्यात मोहम्मद शमीने धारदार गोलंदाजी करून श्रीलंकेचे 5 फलंदाज तंबूत धाडत मोठी कामगिरी केली. पण याच वेळी, बुमराहने 1 विकेट घेत या सामन्यात एक महाविक्रम आपल्या नावावर केला आहे.
नुसती आग ओकतोय शमी -
विश्वचषक - 2023 मधील शमीचा हा तिसराच सामना होता. या तिसऱ्या सामन्यात पाच बळी घेत त्याने श्रीलंकेचे अक्षरशः कंबरडे मोडले. यांपैकी लंकेचे तीन फलंदाज तर बोपळा न फोडताच तंबूत परतले. या सामन्यापूर्वी त्याने न्यूझिलंडविरुद्ध 5, तर इंग्लंड विरुद्धही 4 बळी घेतले होते. या कामगिरीसाठी शमीचे सर्वत्र कौतुक होत असले तरी, या सामन्यात बुमराहने 1 बळी घेत महाविक्रम केला. या विक्रमाचे वैशिष्ट म्हणजे, आजवर कुण्याही भारतीय गोलंदाजाला असा पराक्रम करता आलेला नाही.
बुमराहचा महाविक्रम -
जसप्रीत बुमराहने या सामन्यात डावाच्या पहिल्याच चेंडूवर श्रीलंकन फलंदाज पथुम निसांकाला तंबूत धाडले. बुमराहच्या चेंडूवर खातेही न उघडता पथुम निसांका एलबीडब्ल्यू झाला. या विकेटसह बुमराह एकदिवसीय विश्वचषकात डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. या पूर्वी भारताच्या भल्याभल्या दिग्गज गोलंदाजांनाही असा पराक्रम करता आलेला नाही.
Web Title: IND vs SL No one like Shami! But jasprit bumrah is the only indian bowler to take wicket on 1st ball of innings in world cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.