Dunith Wellalage ICC Award: भारताविरूद्ध झालेल्या वनडे मालिकेत श्रीलंकेने ३-० असा विजय मिळवला होता. या मालिकेत भारतीय फलंदाजी पूर्णपणे अयशस्वी ठरली. टीम इंडियाला रडवणाऱ्या श्रीलंकन गोलंदाजांमधील सर्वात महत्त्वाचा खेळाडू दुनिथ वेल्लालागे होता. त्याने या मालिकेत मालिकावीराचा किताब पटकावला होता. त्यासोबतच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ऑगस्ट महिन्यासाठी श्रीलंका क्रिकेट संघाच्या दुनिथ वेल्लालागेची महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड केली.
श्रीलंकेच्या या युवा अष्टपैलू खेळाडूने दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज आणि वेस्ट इंडिजचा जेडेन सील्स यांना मागे टाकत हा पुरस्कार पटकावला. वेल्लाळगेची ऑगस्टमधील कामगिरी उत्कृष्ट होती. श्रीलंकेच्या वेल्लालागेने मालिकेतील पहिल्या सामन्यात नाबाद ६७ धावांची इनिंग खेळली आणि गोलंदाजीत रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या विकेट्स घेतल्या. त्यानंतर मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ३९ धावा केल्या. तर मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याने महत्त्वाच्या ५ विकेट्स घेतल्या. संपूर्ण मालिकेत त्याने १०८ धावा आणि ७ विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
वेल्लालागेचे प्रतिस्पर्धी महाराज, सील्सची कामगिरी?
केशव महाराजने गेल्या महिन्यात वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली गोलंदाजी केली. त्याने २ सामन्यांत १६च्या सरासरीने १३ बळी घेतले. त्याने पहिल्या कसोटीत एकूण ८ आणि दुसऱ्या कसोटीत ५ गडी मिळविले. सील्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत १८च्या सरासरीने १२ बळी घेतले. मालिकेतील दुसऱ्या कसोटीत त्याने एकूण ९ विकेट्स (३/४५ आणि ६/६१) घेतल्या.