Sandeep Patil on Gautam Gambhir Team India, IND vs SL: टीम इंडिया सध्या श्रीलंकेत आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका आणि त्यानंतर ३ वन डे सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. भारतीय संघ २७ जुलैपासून या दौऱ्याला सुरुवात करेल आणि आधी टी२० मालिकेला सुरुवात होईल. भारत आणि श्रीलंका ( India vs Sri Lanka ) यांच्यात ३ सामन्यांची टी२० मालिका खेळवली संध्याकाळी ७ वाजता पल्लेकल येथील मैदानावर सुरु होणार आहे. ही मालिका गौतम गंभीरसाठी प्रशिक्षक म्हणून पहिली परीक्षा आहे. त्याआधी टीम इंडियाचे माजी सिलेक्टर आणि वर्ल्डकप विजेता माजी क्रिकेटर संदीप पाटील यांनी गंभीरबाबत महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे.
"टीम इंडियाला कोचिंग देणं हे गौतम गंभीरचे काम आहे, असे मला वाटत नाही. खेळाडू परिपक्व (मॅच्युअर्ड) आहेत, त्यामुळे गंभीरचे काम हे संघातील खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मदत करण्याचे आहे. वरिष्ठ क्रिकेट संघामध्ये कोचकडून अशीच अपेक्षा असते. खेळाडूंना समजून घेऊन त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेण्याची कोचवर जबाबदारी असते आणि हेच गंभीरसाठी आव्हान असणार आहे," असे संदीप पाटील म्हणाले.
"गौतम गंभीरने कोच पदाची भूमिका याआधीही चोख पार पाडली आहे. टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून गंभीर त्याच्या पदाला नक्कीच न्याय देत राहिल अशी मला अपेक्षा आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी मेंटॉर म्हणून गौतम गंभीरने अप्रतिम कामगिरी करून दाखवली आहे. मला असं वाटतं की त्याच पद्धतीची उत्तम कामगिरी गौतम गंभीर टीम इंडियासोबतही करेल," असेही मत संदीप पाटील यांनी व्यक्त केले.