IND vs SL Series Full Schedule - रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाची गाडी सुसाट वेगाने पळताना दिसतेय.. न्यूझीलंड पाठोपाठ भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध निर्भेळ यश मिळवले. भारताने वन डे व ट्वेंटी-२० मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवले. ट्वेंटी-२० मालिका जिंकून भारताने २०१६ नंतर आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रोहित सर्व चाचपणी करतोय आणि या प्रयोगात एखादी हार पचवण्याची तयारीही त्याने केली आहे. आता वेस्ट इंडिजनंतर टीम इंडिया घरच्या मैदानावर श्रीलंकेचा पाहुणचार करणार आहे. तीन ट्वेंटी-२० व दोन कसोटी सामन्यांची मालिका गुरुवारपासून सुरू होत आहे.
विंडीजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत रवी बिश्नोई आणि आवेश खान यांना पदार्पणाची संधी मिळाली. बिश्नोईने पहिल्याच सामन्यात छाप पाडली. वेंकटेश अय्यरची फटकेबाजी हा या मालिकेतील सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणावा लागेल. श्रेयस अय्यर व सूर्यकुमार यादव यांच्यामुळे मधली फळी मजबूत झाली आहे. विराट कोहली व रिषभ पंतच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार व वेंकटेश यांनी चांगली खेळी करून दाखवली. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही विराट व रिषभ विश्रांती करणार आहेत. त्यामुळे युवा खेळाडूंना आपले स्थान अधिक बळकट करण्याची संधी आहे.
तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दीपक चहरला झालेली दुखापत भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. कदाचित चहरला मालिकेतून माघार घ्यावी लागू शकते. शार्दूल ठाकूरलाही विश्रांती दिली गेली आहे आणि अशात मोहम्मद सिराज, आवेश खान, हर्षल पटेल हे भुवनेश्वर कुमारला साथ देतील. रवींद्र जडेजाचे पुनरागमन ही भारतासाठी जमेची बाजू आहे. रिषभच्या अनुपस्थितीत संजू सॅमसन व दीपक हुडा यांना संधी मिळू शकते. ऋतुराज गायकवाडला या मालिकेत योग्य संधी मिळण्याची अपेक्षा आहे.
भारताचा T20 संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान