Hardik Pandya IND vs SL ODI Series : २७ जुलैपासून श्रीलंका आणि भारत यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळेल. मात्र, यासाठी अद्याप बीसीसीआयने आपला संघ जाहीर केला नाही. हार्दिक पांड्याने ट्वेंटी-२० विश्वचषकात शानदार कामगिरी केली होती. पण तो आगामी मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचे कळते. विश्वचषकानंतर भारताची युवा ब्रिगेड झिम्बाब्वे दौऱ्यावर गेली होती, जिथे शुबमन गिलच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ४-१ ने विजय साकारला.
झिम्बाब्वे दौऱ्यातून वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. पण, आता श्रीलंका दौऱ्यावर विश्वचषकात खेळणारे काही वरिष्ठ खेळाडू दिसण्याची शक्यता आहे. बीसीसीआयसह नवनिर्वाचित प्रशिक्षक गौतम गंभीर याचीच चाचपणी करत आहे. अशातच 'एक्सप्रेस स्पोर्ट्स'च्या एका रिपोर्टने क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ माजली.
रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्याने वैयक्तिक कारणास्तव बीसीसीआयकडे सुट्टी मागितली आहे. त्यामुळे हार्दिक श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. तसेच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना वन डे मालिकेत खेळवण्यासाठी इच्छुक आहे. कारण विश्वचषक जिंकल्यापासून वरिष्ठ खेळाडूंनी बराच आराम केला आहे. अलीकडेच बीसीसीआयने भारताच्या श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले.
ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक -पहिला सामना - २७ जुलै - संध्याकाळी ७ वा.दुसरा सामना - २८ जुलै - संध्याकाळी ७ वा.तिसरा सामना - ३० जुलै - संध्याकाळी ७ वा.
वन डे मालिकेचे वेळापत्रक - पहिला सामना - २ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.दुसरा सामना - ४ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.तिसरा सामना - ७ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.