Wriddhiman Saha slams Ganguly and Dravid : बीसीसीआयने शनिवारी आगमी श्रीलंकाविरुद्धच्या तीन ट्वेंटी-२० व दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्माकडे ( Rohit Sharma) आता अधिकृतपणे कसोटी संघाचेही कर्णधारपद गेले आहे. पण, या मालिकेसाठीच्या कसोटी संघात स्थान न मिळालेल्या यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यांच्यावर टीका केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध नोव्हेंबर महिन्यात मान दुखत असूनही ६१ धावांची खेळी मी केली होती आणि त्यानंतर मला निवृत्ती घेण्याचा सल्ला राहुल द्रविडने दिला होता.
''न्यूझीलंडविरुद्ध मी मानेच्या दुखापतीसह खेळलो होतो आणि आम्ही विजयाच्या नजीक पोहोचलोच होतो. तेव्हा दादा ( गांगुली) मला म्हणाला होता, की जोपर्यंत मी इथे आहे, तोपर्यंत तुला चिंता करण्याची गरज नाही. त्याच्या त्या वाक्याने मला मानसिक प्रेरणा मिळाली होती. पण, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर चित्र परस्पर विरोधी दिसले. मला धक्काच बसला. एका कसोटी मालिकेनंतर असे काय घडले, हेच मला कळेनासे झाले. माझं वाढतं वय कारणीभूत आहे की काही?, दादा काही वेगळंच म्हणाला होता आणि प्रत्यक्षात त्याच्या विरुद्ध सगळे घडले. त्यामुळेच मला अधिक धक्का बसला,''असे वृद्धिमान साहाने सांगितले.
३७ वर्षीय वृद्धिमान साहा आता भारताच्या क्रिकेट भविष्यातील वाटचालीचा भाग नसेल. निवड समिती प्रमुख चेतन शर्मा म्हणाले,''आम्ही वयाला इतकं महत्त्व देत नाही. पण, जेव्हा एखादा युवा खेळाडू संघाबाहेर असतो, तेव्हा त्याला संधी देण्याचा विचार निवड समिती नक्कीच करते.'' साहाने ४० कसोटी सामन्यांत १३५३ धावा केल्या आहेत . त्यात तीन शतकांचा समावेश आहे. त्याने यष्टिंमागे १०४ बळी टिपले असून त्यात ९२ झेल व १२ स्टम्पिंगचा समावेश आहे.