Nuwan Thushara ruled out, IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेला २७ जुलैपासून सुरुवात होणार आहे. आगामी मालिकेसाठी टीम इंडिया पल्लेकलला पोहोचली असून नेट प्रक्टिसमध्ये घाम गाळत आहे. याच दरम्यान, मालिका सुरु होण्याआधी श्रीलंकेच्या संघाला दुसरा मोठा झटका बसला आहे. दुष्मंथा चमिरानंतर आता श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषाराही टी२० मालिकेतून बाहेर झाला आहे.
दुखापतीमुळे तुषाराची मालिकेतून माघार
तीन सामन्यांच्या टी२० मालिकेपूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषारा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर आहे. श्रीलंका क्रिकेटने ट्विट करून ही माहिती दिली आहे. बोर्डाकडून सांगण्यात आले आहे की बुधवारी रात्री क्षेत्ररक्षणाचा सराव करताना त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे तो या मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही. वैद्यकीय अहवालानुसार त्यांच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
आधीच चमिराही मालिकेतून बाहेर, दोन बदली खेळाडूंना संधी
यापूर्वी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमिराही मालिकेतून बाहेर झाला आहे. श्रीलंका क्रिकेटने दिलेल्या माहितीनुसार, तो ब्राँकायटिस आणि श्वसनाच्या संसर्गाने ग्रस्त आहे. त्यामुळे तो टी२० आणि वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी असिथा फर्नांडोचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर आता तुषाराच्या जागी या मालिकेत मदुशंकाला संघात स्थान मिळाले आहे.