मुंबई : भारतीय संघ नववर्षातील आपल्या अभियानाची सुरूवात श्रीलंकेविरूद्धच्या मायदेशातील मालिकेतून करणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 ट्वेंटी-20 आणि 3 वन डे सामने खेळवले जाणार आहेत. आगामी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. खरं तर ट्वेंटी-20 मालिकेसाठी भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय संघ आशियाई किंग्ज यांचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे.
दरम्यान, रोहित शर्मा बोटाच्या दुखापतीतून सावरल्यानंतर त्याच्या खांद्यावर वन डे मालिकेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने आगामी वन डे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ खेळाडूंना ट्वेंटी-20 मालिकेतून विश्रांती दिली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे ट्वेंटी-20 मालिकेचा हिस्सा नसणार आहेत.
चहल-अक्षरला वगळण्याची शक्यताइंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांना वगळून कुलदीप यादवला स्थान दिले जाणार आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्यात रस्सीखेच होणार आहे. कारण भारतीय संघ दोन रिस्ट-स्पिनर्ससह जाण्याची शक्यता फारच कमी आहे. अष्टपैलू खेळाडूसाठी वॉशिंग्टन सुंदर अक्षर पटेलला मागे टाकून संघात जागा मिळवू शकतो. पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करण्याची सुंदरची क्षमता त्याची जमेची बाजू ठरू शकते.
शुबमन गिल ट्वेंटी-20 मध्ये करणार पदार्पण शुबमन गिलने भारतीय संघाकडून 13 कसोटी आणि 15 वन डे सामने खेळले आहेत. परंतु हा सलामीवीर फलंदाज अद्याप भारतासाठी ट्वेंटी-20 मध्ये पदार्पण करू शकला नाही. त्याने गुजरात टायटन्सच्या पहिल्या IPL हंगामात 483 धावा करून विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, परंतु तरीही त्याला सर्वात लहान स्वरूपात संधी देण्यात आली नाही. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासोबत, तो मंगळवारी वानखेडेवर ईशान किशनसोबत सलामीला उतरणार आहे.
पहिल्या सामन्यासाठी संभावित प्लेइंग XI हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, हर्षल पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा ट्वेंटी-20 संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.
श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.
भारत विरूद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
- 3 जानेवारी, मंगळवार - पहिला ट्वेंटी-20 सामना, मुंबई
- 5 जानेवारी, गुरूवार - दुसरा ट्वेंटी-20 सामना, पुणे
- 7 जानेवारी, शनिवार - तिसरा ट्वेंटी-20 सामना, राजकोट
- 10 जानेवारी, मंगळवार, पहिला वन डे सामना, गुवाहटी
- 12 जानेवारी, गुरूवार, दुसरा वन डे सामना, कोलकाता
- 15 जानेवारी, रविवार, तिसरा वन डे सामना, त्रिवेंद्रम
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"