Sri Lanka squad announced, IND vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा संघ कालच रवाना झाला. या दौऱ्याची सुरुवात २७ जुलैच्या टी२० मालिकेपासून होणार आहे. भारताविरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी श्रीलंकेनेही आपला संघ जाहीर केला आहे. या मालिकेआधी वानिंदू हसरंगा याने संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यामुळे या मालिकेसाठी श्रीलंकेने नवा टी२० कर्णधार म्हणून अष्टपैलू चरिथ असलंका याची निवड केली आहे. नुकत्याच झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेच्या निराशाजनक कामगिरीनंतर त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. अशा स्थितीत आता असलंका याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.
श्रीलंका क्रिकेट निवड समितीने टी२० मालिका खेळण्यासाठी १६ खेळाडूंच्या संघाची निवड केली आहे. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री हरिन फर्नांडो यांनी या संघाला मान्यता दिली आहे. २७, २८ आणि ३० जुलैला पल्लेकल येथे हे तीन सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या महिष तिक्षणा, मथिशा पाथिराना, नुवान तुषारा यासारख्या अनेक स्टार्सचा या संघात समावेश करण्यात आला आहे.
भारताविरुद्ध श्रीलंकेचा संघ- चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, महिश तिक्षणा, चामिंदू विक्रमसिंगे, मथिशा पाथिराना, नुवान थुसारा, दुनिथ वेल्लालागे, दुश्मंता चामिरा, बिनुरा फर्नांडो