Suryakumar Yadav on Gautam Gambhir, IND vs SL: रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा या तीन अनुभवी खेळाडूंनी टी२० विश्वविजेतेपद मिळवून निवृत्ती स्वीकारली. उद्या टीम इंडिया पहिल्यांदाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. ३ टी२० सामन्यांच्या मालिकेची ( India vs Sri Lanka T20 Series ) सुरुवात श्रीलंकेविरूद्ध पल्लेकलच्या मैदानावर होणार आहे. भारतीय संघ गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच क्रिकेट खेळणार आहे. सूर्यकुमार यादव-गौतम गंभीर या कर्णधार-प्रशिक्षक जोडीची ही पहिलीच परीक्षा असणार आहे. याआधी आज सूर्याने पत्रकार परिषद घेत गौतम गंभीरसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांबाबत मत व्यक्त केले.
"माझं आणि गौतम गंभीरचं नातं हे खूपच खास आहे. २१०४ पासून ते आतापर्यंत आमही १० वर्ष एकमेकांना ओळखतो. २०१८ साली मी वेगळी IPL टीम जॉईन केली, तो देखील वेगळ्या संघाचा मेंटॉर झाला. पण या कालावधीतही आम्ही सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असायचो. तो जेव्हा वेगळ्या संघांशी संबंधित होता, तेव्हादेखील मी त्याच्याकडून टिप्स घेत असायचो. सामना संपल्यानंतर आम्ही नेहमी माझा खेळ सुधारण्यावर आणि सामन्यात घडलेल्या महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करायचो," असे सूर्याने गौतम गंभीरबाबत सांगितले.
तो समोरून चालत आला तरी...
"मी गेल्या ६ वर्षांपासून त्याच्याकडून शिकतो आहे. बराच काळ मी त्याच्या सोबतही नव्हतो पण त्याच्याकडून शिकत राहायचो. म्हणूनच आमचं नातं खूप खास आहे. आम्ही खेळाच्या बाबतीत चर्चा केल्या आहेत. तो मोजक्याच शब्दात म्हणणं मांडतो. तो समोरून चालत आला तरी मला कळतं की तो काय सांगणार आहे. आम्हाला एकमेकांच्या देहबोलीवरूनच अंदाज येतो की आम्हाला एकमेकांना काय सांगायचे आहे. काही वेळा मी काहीच न बोलताही त्याला माझं म्हणणं कळतं आणि मलाही त्याचं मत समजतं. कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यातील हे नातं खूपच स्पेशल आहे. त्यामुळेच मला नव्या प्रवासाबाबत खूप कुतूहल आहे," असे सूर्यकुमारने स्पष्ट केले.