IND vs SL T20 Series : भारत दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेच्या संघाला मोठा दुहेरी धक्का बसला. फिरकी गोलंदाज महिष तिक्ष्णा आणि वेगवान गोलंदाज शिरन फर्नांडो हे दोन स्टार खेळाडू दुखापतींमुळे उर्वरित दोन्ही टी२० सामन्यांना मुकणार आहेत. श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा याआधीच मालिकेबाहेर झाला होता. त्याबरोबरच इएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार फलंदाज कुसल मेंडिस याचाही सामन्यातील सहभाग संशयास्पद आहे. त्यामुळे आधीच तुलनेने बलाढ्य असलेल्या टीम इंडियाशी अशा परिस्थितीत दोन हात कसे करावे, असा प्रश्न श्रीलंकेच्या संघापुढे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी कुशल मेंडिस वेळेत तंदुरुस्त होऊ शकतो. पण टी२० मालिकेत त्याचा समावेश साशंकच आहे. या दरम्यान, यष्टिरक्षक फलंदाज निरोशन डिक्वेल्ला आणि धनंजय डी सिल्वा यांचा शेवटच्या दोन सामन्यांसाठी टी२० संघात समावेश करण्यात आला आहे. भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी डिक्वेल्ला आणि डी सिल्वा हे आधीच संघाचा भाग आहेत.
महिष तिक्ष्णा आणि कुसल मेंडिस हे सध्याच्या श्रीलंकेच्या संघातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानले जातात. शिरन फर्नांडोनेही अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. त्यातच स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगा कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला असताना श्रीलंकेला हे धक्के बसल्याने त्यांची डोकेदुखी अधिकच वाढल्याचं दिसतंय.
दरम्यान, भारतीय संघाने पहिल्या टी२० मध्ये लंकेला ६२ धावांनी पराभूत केलं. इशान किशनच्या ८९ आणि श्रेयस अय्यरच्या नाबाद ५७ धावांच्या जोरावर भारताने १९९ धावा केल्या. त्यानंतर भारताकडून भुवनेश्वर कुमारने ९ धावांत २ बळी तर वेंकटेश अय्यरनेही २ बळी घेत सामना जिंकवून दिला.