India vs Sri Lanka, 2nd T20I Pune : भारतीय संघाने २०२३ची सुरूवात विजयाने केली. आशियाई विजेत्या श्रीलंकेने अखेरच्या चेंडूपर्यंत कडवी टक्कर दिली, हेही विसरून चालता येणार नाही. भारताच्या १६२ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने १६० धावा केल्या अन् अवघ्या दोन धावांनी त्यांचा पराभव झाला. अक्षर पटेलने २०व्या षटकात श्रीलंकेला १३ धावा करू दिल्या नाही. भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि पुढील सामना उद्या पुण्यात होणार आहे. पण, या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) खेळणार की नाही, ही चिंता चाहत्यांना सतावत आहे.
मला भारतीय संघाला आव्हानात्मक परिस्थितीत ठेवायचे होते, कारण...; असं का म्हणाला हार्दिक पांड्या?
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात भानुका राजपक्षाचा झेल टिपताना हार्दिकचा पाय मुरगळला आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. काहीकाळ सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. १५व्या षटकात हार्दिक पुन्हा मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी आला. शिवम मावीच्या गोलंदाजीवर हार्दिकने श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगाचा झेलही टिपला. पण, एक षटक शिल्लक असूनही हार्दिकने २०वे षटक स्वतः न टाकता अक्षरला दिले. त्यामुळे हार्दिकची दुखापत गंभीर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, आम्ही कदाचित हा सामना गमावला असता आणि ते ठिकही होते. युवा खेळाडूंनी या सामन्यात पुनरागमन करून दिले. शिवम मावीला आयपीएलमध्ये गोलंदाजी करताना मी पाहिले आहे आणि आज त्याला मी तशीच कामगिरी कर असे सांगितले. तू जास्त धावा दिल्यास तरी मी तुझ्या पाठिशी उभा आहे, असा विश्वास मी त्याला दिला. मला भारतीय संघाला आव्हानात्मक परिस्थितीत टाकायचे होते, कारण मोठ्या सामन्यांसाठी हा अनुभव उपयोगी येणार आहे.
दुखापतीबाबत हार्दिकने म्हटले की,माझा पाय मुरगळला होता, परंतु मी ठिक आहे. दुखापत गंभीर नाही. मी हसतोय म्हणजे सर्वकाही व्यवस्थित आहे, हेच समजा.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"