India vs Sri Lanka, Rohit Sharma: भारताच्या वरिष्ठ संघाने टी२० विश्वचषक जिंकला. आता छोटाशा विश्रांतीनंतर भारतीय संघ पुन्हा मैदानात उतरणार आहे. श्रीलंकाविरूद्ध ( IND vs SL ) भारतीय संघाचा टी२० आणि वनडे मालिकेचा दौरा २७ जुलैपासून सुरु होत आहे. या दौऱ्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव कर्णधार असणार आहे. तर वनडे मालिकेसाठी रोहित शर्माकडे संघाचे नेतृत्व असणार आहे. २ ऑगस्टपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. श्रीलंकेविरूद्धच्या या दौऱ्यावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मोठा इतिहास रचू शकतो.
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका २ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान कोलंबोमध्ये खेळवली जाईल. श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेदरम्यान एक मोठा विक्रम रोहितच्या दृष्टीपथात आहे. रोहितने जर या मालिकेत दोन शतके झळकावली, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतके पूर्ण करेल. या पराक्रमासह 'हिटमॅन' भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतके झळकावणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरू शकेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०पेक्षा जास्त शतके झळकावणाऱ्या भारतीयांमध्ये दोन दिग्गजांची नावे आहेत. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण १०० शतके ठोकली आहेत. त्यात ५१ कसोटी शतके तर ४९ वनडे शतके आहेत. या यादीत दुसरा फलंदाज विराट कोहली आहे. त्याच्या नावावर २९ कसोटी शतके, ५० वनडे शतके आणि १ टी२० शतकाचा समावेश आहे.