लखनौ - श्रीलंकेविरुद्ध गुरुवार २४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेपूर्वी भारतीय संघाला जोरदार धक्के बसले आहेत. काल वेगवान गोलंदाज दीपक चहर दुखापतीमुळे संघाबाहेर गेला होता. तर आज धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव हा सुद्धा दुखापतीमुळे संघातून बाहेर पडल्याचे वृत्त आले आहे.
नुकत्याच आटोपलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादवने दमदार फलंदाजी केली होती. दरम्यान, हेअरलाईन फ्रॅक्चरमुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला मुकावे लागणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी, २४ फेब्रुवारी रोजी लखनौमध्ये खेळवण्यात येणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार सूर्यकुमार यादवला वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकात्यामध्ये खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात दुखापत झाली होती. सूर्यकुमारला झालेली दुखापत किती गंभीर आहे आणि त्याला संघात पुनरागमन करण्यासाठी किती वेळ लागेल. याबाबतची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. तत्पूर्वी मंगळवारी संध्याकाळी वेगवान गोलंदाज दीपक चहर हा दुखापतीमुळे संघातून बाहेर पडल्याचे वृत्त आले होते. मिळालेल्या माहितीनुसार मांडीचे स्नायू ताणले गेल्याने चहरने भारतीय संघाचे बायो-बबल सोडले आहे. त्याला संघात परतण्यासाठी पाच ते सहा आठवडे लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेसाठी विराट कोहली, ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूर यांना विश्रांती देण्यात आली असून जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन होत आहे. जडेजाने सुमारे तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. पंतच्या अनुपस्थितीत इशान किशन यष्टिरक्षण करणार असून अतिरिक्त यष्टिरक्षक म्हणून संजू सॅमसनचीही संघात निवड झाली आहे.
श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेतील पहिला सामना २४ फेब्रुवारी रोजी लखनौमध्ये होणार आहे. तर त्यानंतर भारतीय संघ धरमशाला येथे २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी पुढील सामने खेळणार आहे.