Join us  

WTC Points Table, IND vs SL Test : भारत-श्रीलंका कसोटी मालिकेत भिडणार, पण दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने वाढवलीय टीम इंडियाची चिंता

India vs Sri Lanka Test Series : भारत-श्रीलंका यांच्यातल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून सुरूवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 9:15 AM

Open in App

India vs Sri Lanka Test Series : भारत-श्रीलंका यांच्यातल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ही मालिका असल्याने दोन्ही संघांचा विजय मिळवून अंतिम फेरीच्या शर्यतीत कायम राहण्याचा प्रयत्न असणार आहे. पण, या मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी टीम इंडियाला धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड ( New Zealand vs South Africa) यांच्यातल्या कसोटी मालिकेतील निकालाने WTC च्या मागच्या पर्वाच्या फायनलिस्टना हा धक्का बसला. भारत आणि न्यूझीलंड यांची गुणतालिकेत घसरगुंडी झाली आहे आणि आता अंतिम फेरीचा मार्ग खडतर झाला आहे.

न्यूझीलंड दौऱ्यावर पहिल्या कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागलेल्या आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात कमबॅक केले. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ३६४ धावा करणाऱ्या आफ्रिकेने यजमानांचा पहिला डाव २९३ धावांवर गुंडाळला. त्यानंतर दुसरा डाव ९ बाद ३५४ धावांवर घोषित करून न्यूझीलंडसमोर  ४२६ धावांचे लक्ष्य ठेवले. दुसऱ्या डावातही न्यूझीलंडचा डाव गडगडला. डेव्हॉन कॉनवे ( ९२) व टॉम ब्लंडल ( ४४) वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ २२७ धावांवर तंबूत परतला आणि आफ्रिकेने १९८ धावांनी सामना जिंकला. या पराभवामुळे न्यूझीलंड व भारताला धक्का बसला.

आफ्रिकेने आता ३६ गुणांसोबत ६० टक्के जय-पराजयाची टक्केवारी मिळवून चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. भारत ५३ गुण असूनही ४९.०७ टक्केवारीमुळे पाचव्या, तर न्यूझीलंड २८ गुणांसोबत ३८.८८ टक्केवारीसह सहाव्या क्रमांकावर आहे. श्रीलंका २४ गुण व १०० टक्क्यांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ( ८६.६६ टक्के), पाकिस्तान ( ७५ टक्के) यांचा क्रमांक येतो.  श्रीलंका विरुद्धच्या मालिकेत दोन्ही सामने भारताने जिंकल्यास ते या क्रमवारीत आगेकूच करतील.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाद. आफ्रिकान्यूझीलंड
Open in App