Double blow to Sri Lanka vs team India: भारत आणि श्रीलंका ( IND vs SL ) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या संघांमधील पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. मात्र, त्याआधीच यजमान संघाला दोन मोठे झटके बसले आहेत. त्यांचे दोन प्रमुख वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना आणि दिलशान मदुशंका यांनी वनडे मालिकेतून माघार घेतली आहे.
मथिशा पाथिराना खांद्याच्या दुखापतीने ग्रस्त आहे तर दिलशान मदुशंका हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर आहे. आधीच दुष्मंथा चमिरा आणि नुवान तुषारा यांनी टी२० पाठोपाठ वनडे मालिकेतून माघार घेतली होती. त्यात आता मथिशा पाथिराना आणि दिलशान मदुशंका हे दोन वेगवान गोलंदाजही दुखापतग्रस्त झाल्याने श्रीलंकन संघ मोठ्या संकटात सापडला आहे. ट्विटरवर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात माहिती दिली आहे. या दोन खेळाडूंच्या जागी युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद शिराज आणि एशान मलिंगा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय कुसल जनिथ, प्रमोद मदुशन आणि जेफ्री वाँडरसे हे तीन खेळाडू स्टँडबाय आहेत.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या वृत्तानुसार, दिलशान मदुशंका याच्या डाव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली आहे. ही दुखापत 'ग्रेड २' स्वरुपाची असल्याने त्याला संपूर्ण मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. सराव सत्रात फिल्डिंग प्रॅक्टिस सुरु असताना त्याला ही दुखापत झाली. दुसरीकडे मथिशा पाथिरानाच्या उजव्या हातालाच दुखापत झाली आहे. तिसऱ्या टी२० सामन्यात झेल टिपण्यासाठी प्रयत्न करत असताना त्याच्या उजव्या खांद्याच्या स्नायूंवर ताण आला. त्यामुळे त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.