मोहाली : अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने दीडशतकी खेळीत तब्बल १७५ (२२८ चेंडू, १७ चौकार, ३ षटकार) धावा केल्या. जडेजाच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेपुढे धावडोंगर उभा केला. आठ बाद ५७४ धावांवर पहिला डाव घोषित केल्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजांना फारशी मोकळीक न देता त्यांना ४ बाद १०८ असे कोंडीत पकडले आहे. लंका संघ ४६६ धावांनी मागे असून फॉलोऑन टाळण्यासाठी अद्यापही २६७ धावांची गरज आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विनने दोन आणि रवींद्र जडेजा तसेच जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. पाथूम निसांका २६ आणि चरिथ असालंका (१) खेळपट्टीवर आहेत. लाहिरू थिरिमाने १७ आणि धनंजय डिसिल्व्हा १ हे अश्विनचे बळी ठरले. जडेजाने दिमुथ करुणारत्ने (२८) याला माघारी पाठविले. ॲंजेलो मॅथ्यूज (२२) बुमराहच्या चेंडूवर बाद झाला.
त्याआधी जडेजाने दुसरे शतक साजरे करताना १७५ धावांची खेळी केली. त्याने अश्विनसोबत (६१) सातव्या गड्यासाठी १३१ धावांची भागीदारी केली. काल पहिल्या दिवशी ऋषभ पंत ९६ आणि हनुमा विहारी ५८ धावा काढून बाद झाले. कमलच्या चेंडूवर अश्विन झेलबाद झाला. त्याने ८२ चेंडूंमध्ये आठ चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. तर दुसरीकडे जडेजाने मैदानावर घट्ट पाय रोवून श्रीलंकेच्या गोलंदाजांना जेरीस आणले.
जयंत यादव दोन धावांवर झेलबाद झाल्यानंतर मोहम्मद शमीने जडेजाला चांगली साथ दिली. शमीच्या मदतीमुळे धावफलक हलता राहिला. शेवटी भारताने आपला डाव घोषित केल्यामुळे मोहम्मद शमी आणि जडेजा नाबाद राहिले. श्रीलंकेकडून कमल, विश्वा फर्नांडो, एम्बुल्देनिया या गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर लाहिरी कुमारा आणि धनंजय सिल्वा यांनी प्रत्येकी एक बळी बाद केला. एम्बुल्देनियाने ४६ षटके टाकून १८८ धावा दिल्या. तर विश्वा फर्नांडोने २६ षटकांमध्ये १३५ धावा मोजल्या.
कपिलचा विक्रम मोडलाकारकिर्दीत सर्वोच्च नाबाद १७५ धावा ठोकणाऱ्या जडेजाने कसोटीत सातव्या स्थानावर फलंदाजी करीत सर्वांत मोठी खेळी केली. त्याने कपिल देव यांचा विक्रम मोडित काढला. कपिल यांनी १९८६ ला श्रीलंकेविरुद्ध कानपूर कसोटीत १६३ धावा ठोकल्या होत्या. त्याने कसोटीत २९ डावानंतर शतक ठोकले.
n कसोटी संघातील अव्वल आठ फलंदाजांची एखाद्या कसोटीत २५ च्या वर धावा काढण्याची ही केवळ चौथी वेळ. विशेष असे की याआधी २००७ ला भारताने इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती.n भारताच्या पहिल्या डावात ८ बाद ५७४ या मोहाली मैदानावर सर्वोच्च धावा आहेत. भारताने २०१५ नंतर १६ व्यांदा ५०० हून अधिक धावा उभारल्या. २०१८च्या सुरुवातीपासून कसोटीत भारताची ही चौथी सर्वोच्च धावसंख्या ठरली.n ६१ धावा काढणाऱ्या अश्विनने कारकिर्दीत ११ वे आणि लंकेविरुद्ध तिसरे अर्धशतक झळकाविले. अश्विनची श्रीलंकेवरुद्ध ही सर्वोत्कृष्ट खेळी ठरली.n सातव्या गड्यासाठी जडेजा- अश्विन यांनी १७४ चेंडूत १३० धावांची भागीदारी केली. जडेजा- अश्विन यांनी प्रथमच सोबत फलंदाजी करीत शतकी भागीदारी नोंदविली.n जडेजा- अश्विन यांनी सातव्या गड्यासाठी ज्या १३० धावा ठोकल्या ती भारताकडून सर्वांत मोठी भागीदारी ठरली आहे.n शमी- जडेजा यांनी नवव्या गड्यासाठी ९४ चेंडूत नाबाद १०३ धावा केल्या.