IND vs THAI, Women's Asia Cup : भारतीय महिला संघाने आशिया चषक २०२२ स्पर्धेत थायलंडविरुद्ध दमदार कामगिरी केली. भारतीय संघाने १४ षटकं व ९ विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या गुणतालिकेत १० गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. सब्बिनेनी मेघना ( २०*) व पूजा वस्त्राकर ( १२*) यांनी नाबाद खेळी करताना ६ षटकांत १ बाद ४० धावा करून भारताचा विजय पक्का केला. शफाली वर्मा ८ धावांवर बाद झाली. याच थायलंडने काही दिवसांआधी पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला होता. आज त्यांनाच भारताने ३६ चेंडूंत हरवलं.
स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि प्रतिस्पर्धी थायलंडला १५.१ षटकांत ३७ धावांवर गुंडाळले. स्मृतीचा हा १०० वा ट्वेंटी-२० सामना आहे आणि भारताकडून हरमनप्रीत कौर ( १३५) हिच्यानंतर शंभर ट्वेंटी-२० सामना खेळणारी ती दुसरी खेळाडू आहे. आशिया चषक २०२२ मध्ये उपांत्य फेरीत आधीच स्थान पक्क करणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी आज चांगली कामगिरी केली. थायलंडची सलामीवीर नन्नपट कोंचारोएंकाने सर्वाधिक १२ धाव केल्या. तिच्या व्यतिरिक्त थायलंडच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. स्नेह राणाने ९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्मा ( २-१०) व राजेश्वर गायकवाड ( २-८) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. मेघना सिंगने १ विकेट घेतली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"