नवी दिल्ली : सध्या दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर ICC अंडर-19 महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आज भारत आणि यूएई यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला आणि आपला विजयरथ कायम ठेवला. भारतीय कर्णधार शेफाली वर्मा आणि श्वेता सेहरावत यांनी पुन्हा एकदा शानदार खेळी करून भारताला विजय मिळवून दिली. भारताचा या विश्वचषकातील हा सलग दुसरा विजय आहे. भारताने 20 षटकांत 3 बाद 219 धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग करताना यूएईला पूर्णपणे अपयश आले.
तत्पुर्वी, यूएईच्या संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराचा निर्णय चुकीचा ठरवत शानदार खेळी केली. सलामीवीर शेफाली वर्मा आणि श्वेता सेहरावत यांनी पहिल्या बळीसाठी 111 धावांची भागीदारी नोंदवली. सलामीच्या सामन्यात देखील शेफाली आणि पूजा यांच्या जोडीने भारताला आक्रमक सुरूवात करून दिली होती. आज शेफाली वर्मा (78) धावा करून बाद झाली तर श्वेता सेहरावतने (74) धावांची खेळी केली. याशिवाय यष्टीरक्षक रिचा घोषने 49 धावा करून यूएईसमोर 220 धावांचे तगडे आव्हान ठेवले.
भारताचा विजयरथ कायम 220 धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना यूएईने साजेशी सुरूवात केली. कर्णधार तीर्थ सतीश 5 चेंडूत 16 धावा करून तंबूत परतली. तर लावण्य केणी (22) आणि महिका गौर (26) यांनी संयमी खेळी केली मात्र त्यांना पराभव टाळता आला नाही. भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर यूएईचा संघ गारद झाला आणि 20 षटकांत 5 बाद केवळ 97 धावा करू शकला. भारतीय गोलंदाजांनी सांघिक खेळीच्या जोरावर विश्वचषकातील सलग दुसरा सामना आपल्या नावावर केला. भारताकडून महिका गौर, टिटस साधू, मन्नत कश्यप आणि पार्श्वरी चोपरा यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. अखेर भारतीय संघाने 122 धावांनी यूएईचा पराभव केला.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत, गोंगडी त्रिशा, रिचा घोष (यष्टीरक्षक), सोनिया मेंहदिया, हृषिता बसू, टिटस साधू, अर्चना देवी, मन्नत कश्यप, पार्शवी चोप्रा, शबनम एमडी.
ICC अंडर-19 महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाची स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत 14 ते 29 जानेवारी 2023 दरम्यान खेळवली जात आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले आहेत. भारताला दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि स्कॉटलंडसह गट ड मध्ये ठेवण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"