Team India Playing XI, T20 World Cup 2024 India vs America: टीम इंडियाची टी२० विश्वचषकाची सुरुवात दमदार झाली आहे. पहिल्या सामन्यात भारताने दुबळ्या आयर्लंडला पराभवाची धूळ चारली. तर दुसऱ्या सामन्यात अतिशय अटीतटीच्या लढतीत भारताने पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळे आता भारतीय संघ सुपर-8 फेरीत स्थान मिळवण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. आज भारत विजयाच्या उद्देशाने अमेरिकेविरुद्ध ( IND vs USA ) मैदानात उतरणार आहे. गोलंदाजांनी भारताला पहिल्या दोन सामन्यात कठीण खेळपट्टीवर विजय मिळवून दिला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित शर्मा आणि राहुल द्रविडने संघासाठी एक प्रयोग केला होता, जो पूर्णपणे अपयशी ठरला. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघ एक बदल करण्याची दाट शक्यता आहे.
विराट सलामीवीर म्हणून 'फ्लॉप'
विराट कोहलीने IPL मध्ये RCB साठी सलामीला फलंदाजी केली. त्यात तो यशस्वी ठरल्याने २०२४ च्या टी२० विश्वचषकातही संघ व्यवस्थापनाने विराटला तीच भूमिका पार पाडायला दिली. पण आयर्लंडविरुद्ध तो अपयशी ठरलाच. पाठोपाठ पाकिस्तान विरुद्धही त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. विराट कोहली नव्या चेंडूवर खेळताना घाई करत असल्याने जाणकारांनीही बोलून दाखवले. कारण दोन्ही सामन्यात तो ज्या चेंडूवर बाद झाला, तो चेंडू विकेट घेण्याइतका उत्तम नव्हता. विराटच्या चुकीमुळेच तो बाद झाला. अशा परिस्थितीत संघात एक महत्त्वाचा बदल करण्यात येऊ शकतो.
टीम इंडिया चूक सुधारेल?
आता टीम इंडिया चूक सुधारणार का हा प्रश्न आहे. विराट कोहलीने संपूर्ण कारकिर्दीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. तो तिथे चांगला खेळतो. अशा परिस्थितीत रोहित शर्मा त्याला अमेरिके विरुद्ध तिसऱ्या क्रमांकावरच मैदानात उतरवू शकतो. याशिवाय नियमित सलामीवीर यशस्वी जैस्वालला संघात समाविष्ट करून घेतले जाऊ शकते. तर दोनही सामन्यात फारसा उपयुक्त न ठरलेल्या शिवम दुबेला संघातून वगळले जाऊ शकते.