IND vs WA Warm up Match : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीची भारतीय संघाच्या तयारीला आजपासून सुरुवात झाली. भारत विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ( India vs Western Australia) असा सराव सामना पर्थवर खेळवला जातोय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यानंतर विश्रांतीवर गेलेले विराट कोहली व लोकेश राहुल अजूनही आराम करताना दिसले. रोहित शर्मा व रिषभ पंत ही जोडी सलामीला आली आणि पॉवर प्लेपर्यंत तंबूत पुन्हा परतलीही. भारताने पहिल्या सहा षटकांत ४५ धावांत ३ विकेट्स गमावल्या. पण, फॉर्मात असलेला सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) पुन्हा एकदा संकटमोचक बनून धावला. त्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने सन्मानजनक पल्ला गाठला.
रोहित शर्मा, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग व युजवेंद्र चहल ही प्लेइंग इलेव्हन घेऊन भारतीय संघ मैदानावर उतरला. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या संघात डार्सी शॉर्ट, निक हॉब्सन, अॅरोन हार्डली, कॅमेरून बँक्रॉफ्ट, अॅस्टन टर्नर, सॅम फॅनिंग, हॅमिश मॅकेंझी, झाय रिचर्डसन, अँड्य्रू टाय, मॅथ्यू लेली, जेसन बेहरेंडॉर्फ अशी फौज आहे. विराट, आर अश्विन व लोकेश यांना विश्रांती दिली गेली आहे.
रिषभ व रोहित यांनी भारताच्या डावाची सुरूवात केली. बेहरेनडॉर्फने त्याच्या पहिल्याच षटकात रोहितला ३ धावांवर यष्टींमागे झेलबाद करून बाद केले. त्यानंतर दीपक हुडाला बढती दिली आणि त्याने १४ चेंडूंत २२ धावांची खेळी करताना आश्वासक चित्र निर्माण केले, परंतु बेहरेनडॉर्फने त्याचीही विकेट घेतली. रिषभ अँड्य्रू टायच्या गोलंदाजीवर चाचपडताना दिसला अन् सहाव्या षटकात ९ धावांवर माघारी परतला. भारताच्या ३ बाद ४५ धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्या यांनी भारताच्या डावाला आकार दिला. दोघांनी ताबडतोड फटकेबाजी करताना संघाला शतकी धावसंख्येनजीक केले. पण, १२व्या षटकात हार्दिक २९ धावा करून माघारी परतला. सूर्याने फॉर्म कायम राखताना सराव सामन्यातही ५२ धावा केल्या. त्याच्या खेळीत ३ षटकारांचा समावेश होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"