India vs West Indies, 1st ODI Live Updates : वेस्ट इंडिजने पहिल्या वन डे सामन्यात ठेवलेल्या १७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व इशान किशन यांनी टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. कर्णधार रोहितने ( Rohit Sharma) अर्धशतक झळकावताना माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला. त्यानंतर आलेला विराट कोहली ( Virat Kohli) दोन चौकार मारून माघारी परतला, परंतु मोठा पराक्रम नोंदवून गेला अल्झार जोसेफने एका षटकात या दोघांनाही बाद केले.
भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा यांनी दर्जेदार कामगिरी केली. वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डर ( Jason Holder) आणि फॅबियन अॅलेन यांनी संघर्ष करताना भारतासमोर समाधानकारक लक्ष्य उभे करण्यात यश मिळवले. चहलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर सुंदर व कृष्णा यांनी अनुक्रमे ३ व २ विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजचा संघ ४३.५ षटकांत १७६ धावांवर तंबूत परतला.
मोहम्मद सिराजने तिसऱ्याच षटकात शे होपला ( ८) त्रिफळाचीत केले. ब्रँडन किंग ( १३) व डॅरेन ब्राव्हो ( १८) यांनी विंडिजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. वॉशिंग्टन सुंदरने एकाच षटकात या दोघांनाही बाद केले. त्यानंतर युझवेंद्र चहलने सलग दोन चेंडूंवर निकोलस पूरन ( १८) व कर्णधार किरॉन पोलार्ड ( ० ) यांची विकेट घेतली, पण तो हॅटट्रिक घेण्यापासून चुकला. ७ बाद ७९ अशा अवस्थेत सापडलेल्या विंडीजसाठी जेसन होल्डर व फॅबियन अॅलन ही जोडी धावून आली. या दोघांनी ८व्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. वॉशिंग्टन सुंदरने ही भागीदारी तोडताना फॅबियनला २९ धावांवर बाद केले. होल्डर ७१ चेंडूंत ४ षटकारांसह ५७ धावांवर प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर बाद झाला.
घरच्या मैदानावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटने दुसरे स्थान पटकावले आहे. सचिन तेंडुलकर ६९७६ धावांसह अव्वल क्रमांकावर आहे, त्यापाठोपाठ विराटचा ५००२ धावांसह क्रमांक येतो. महेंद्रसिंग धोनी ( ४३५१) व रोहित शर्मा ( ३६७८) हे अव्वल चारमध्ये आहेत. विराटने घरच्या मैदानावर सर्वात जलद ९६ डावांमध्ये ५००० + धावांचा विक्रम आज नावावर केला.