India vs West Indies, 1st ODI Live Updates : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा यांनी दर्जेदार कामगिरी केली. वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डर ( Jason Holder) आणि फॅबियन अॅलेन यांनी संघर्ष करताना भारतासमोर समाधानकारक लक्ष्य उभे करण्यात यश मिळवले. चहलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर सुंदर व कृष्णा यांनी अनुक्रमे ३ व २ विकेट्स घेतल्या. आजच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) घेतलेले तीनही DRS यशस्वी ठरले आणि महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) भारी खूश झाले. त्यांनी आता DRS चे नवे नामांतर केले.
विंडिजचा निम्मा संघ ७१ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर विंडीजने आणखी दोन विकेट्स गमावल्या. ७ बाद ७९ अशा अवस्थेत सापडलेल्या विंडीजसाठी जेसन होल्डर व फॅबियन अॅलन ही जोडी धावून आली. या दोघांनी ८व्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. जेसन होल्डरने वन डेतील ११ वे अर्धशतक पूर्ण करताना २००० धावाही पूर्ण केल्या. वॉशिंग्टन सुंदरने ही भागीदारी तोडताना फॅबियनला २९ धावांवर बाद केले. होल्डर ७१ चेंडूंत ४ षटकारांसह ५७ धावांवर प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर बाद झाला. वेस्ट इंडिजचा संघ ४३.५ षटकांत १७६ धावांवर तंबूत परतला.
सुनील गावस्कर काय म्हणाले?या सामन्यात समालोचन करणारे सुनील गावस्कर रोहित शर्माच्या नेतृत्वकौशल्यावर खूश झाले. ते म्हणाले,''रोहित शर्माने DRS चे अचूक निर्णय घेतले. याआधी जेव्हा धोनीचे DRS चे अधिक निर्णय योग्य ठरले होते, तेव्हा आपण त्याला Dhoni Review System असे म्हणायचो, आता त्याचं नामांतर करून 'Definitely Rohit System असे करायला हवे.''