India vs West Indies, 1st ODI Live Updates : भारत-वेस्ट इंडिज वन डे मालिकेला सुरुवात होण्याच्या काही दिवसांपूर्वी यजमानांच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाला. शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, नवदीप सैनी आणि अक्षर पटेल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि भारतीय संघाला इशान किशन व शाहरुख खान यांचा संघात समावेश करावा लागला. वन डे संघाच्या कर्णधारपदावर नियुक्ती केल्यानंतर रोहित शर्माचा हा पहिलाच सामना आहे आणि त्याने दीपक हुडाला पदार्पणाची संधी दिली. धवनच्या गैरहजेरीत रोहितसह इशान किशनला सलामीला खेळण्याची संधी मिळणार आहे. पण, विलगिकरणात शिखर धवन नेमकं काय करतोय, हे दर्शवणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने तिसऱ्याच षटकात वेस्ट इंडिजला धक्का दिला. सलग दोन चौकार मारणाऱ्या शे होपला ( ८) तिसऱ्या चेंडूवर सिराजने त्रिफळाचीत केले. ब्रँडन किंग व डॅरेन ब्राव्हो यांनी विंडिजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु वॉशिंग्टन सुंदरने एकाच षटकात टीम इंडियाला मोठे यश मिळवून दिले. किंग ( १३ ) व ब्राव्हो ( १८) यांना वॉशिंग्टनने माघारी पाठवले. त्यानंतर निकोलस पूरनला ( १८) धावांवर माघारी पाठवून युझवेंद्र चहलने मोठा पराक्रम केला.
वन डे क्रिकेटमध्ये त्याने १०० विकेट्स पूर्ण केल्या. भारताकडून सर्वात कमी डावांत विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये चहलने ( ६० डाव) झहीर खानला ( ६५ डाव) मागे टाकले. चहलने सलग दुसऱ्या चेंडूवर किरॉन पोलार्डची ( ० ) विकेट घेतली, पण तो हॅटट्रिक घेण्यापासून चुकला. विंडिजचा निम्मा संघ ७१ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर विंडीजने आणखी दोन विकेट्स गमावल्या. २३ षटकांत त्यांची अवस्था ७ बाद ७९ अशी झाली होती. चहलच्या या कामगिरीचे धवनने कौतुक केले आहे आणि त्याने मॅचचा आनंद घेतानाचा फोटो पोस्ट केला आहे.